नवी मुंबई: वाशी येथील भाजीपाला बाजार संकुलाला 'धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल' नाव देण्याचा नामकरण सोहळा सोमवारी पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटले की, धर्मवीर संभाजी राजेंच्या जन्मदिनी भाजीपाला मार्केटचे नाव धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल असे करण्याचा निर्णय तब्बल 20 वर्षांनंतर आमच्या सरकारने घेऊन धर्मवीर संभाजी राजेंना मानाचा मुजरा केला असे म्हणने वावगे ठरणार नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा आत्मा असून आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये आपण सर्वांनी विशेष लक्ष देऊन शेतमाल निर्यातीला चालना देण्याची गरज आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या येणाऱ्या शेतमालाची साठवणूक करण्यासाठी गोदाम व शीतगृहाची सुविधा बाजार समितीने उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल जगाच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बाजार समितीला बजवावी लागणार आहे. स्पर्धात्मक युगात शेतकरी टिकणे अतिशय महत्त्वाचे असून त्याकरीता बाजार समित्यांची भूमिका दिशादर्शक ठरणार आहे. शेतकरी शेतात काबाडकष्ट करतो आणि त्याच्यावरच हजारो लोकांची पोटं चालतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे या भाजीपाला बाजार संकुलाचा नामकरण सोहळा मागच्या सरकारने प्रलंबित ठेवला होता. परंतु, या सरकारने त्यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे या बाजार संकुलाला धर्मवीर सभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल हे नाव देण्यात आल्याचे खोत यांनी सांगितले.
वाशी भाजीपाला मार्केटला छत्रपती संभाजीराजांचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 8:45 PM