वाशीचे पासपोर्ट कार्यालय कागदावरच; कार्यालयासाठी आवश्यक सुविधांची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 02:54 AM2019-03-28T02:54:54+5:302019-03-28T02:55:15+5:30
वाशीत पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होऊन प्रत्यक्षात तेथे कामकाजाला सुरुवात झालेली नाही. शासनाकडून केवळ पासपोर्ट कार्यालयाची घोषणा झालेली असून, अद्याप तेथे अधिकृत कसल्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : वाशीत पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होऊन प्रत्यक्षात तेथे कामकाजाला सुरुवात झालेली नाही. शासनाकडून केवळ पासपोर्ट कार्यालयाची घोषणा झालेली असून, अद्याप तेथे अधिकृत कसल्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत.
पासपोर्ट विभागाकडून वाशीतील पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याच्या घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे येथे दररोज शंभरच्या वर नागरिक पासपोर्टच्या चौकशीसाठी येत आहेत. अशावेळी पोस्टाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नांच्या भडिमाराला सामोरे जावे लागत आहे.
पासपोर्ट काढण्यासाठी होणारी पायपीट टाळण्यासाठी नवी मुंबईतही पासपोर्ट कार्यालय व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे. त्यानुसार केंद्र सरकारकडून गतवर्षी देशभरात मंजूर झालेल्या पासपोर्ट कार्यालयांमध्ये नवी मुंबईचाही समावेश केला गेला.
राजन विचारे यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या प्रचारामुळे पासपोर्ट संबंधी चौकशीसाठी नागरिकांची पोस्ट कार्यालयात गर्दी वाढली आहे.
यामुळे पोस्ट कर्मचाऱ्यांकडून तिथला पासपोर्ट कार्यालयाचा बोर्ड देखील काढून ठेवण्यात आला होता. मात्र, राजकीय दबावानंतर तो पुन्हा लावण्यात आला. पासपोर्ट कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पोस्टाच्या कार्यालयातील ज्या जागेचा वापर करण्यात आला, ती पोस्ट कर्मचाऱ्यांच्या बैठकीची जागा आहे.
उद्घाटनाच्या दिवशी रविवारी सुट्टी असतानाही काही कर्मचाºयांना बोलावून एक दिवसासाठी तिथले सामान हटवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पोस्ट कर्मचाºयांकडूनच त्या जागेचा वापर होत असल्याने, पासपोर्ट कार्यालयासाठी अद्याप जागाच निश्चित झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
नवी मुंबईत पासपोर्ट कार्यालयाची केवळ घोषणा झालेली आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे नवी मुंबईत अद्याप अधिकृतपणे पासपोर्ट कार्यालय सुरू झालेले नाही. आचारसंहिता संपल्यानंतर यासंबंधीच्या प्रक्रियेला सुरुवात होणे अपेक्षित आहे. - हरीश फुलपडिया, उपविभागीय अधिकारी-पासपोर्ट विभाग