वाशीत रंगला ‘सखी महोत्सव २०१७’
By admin | Published: April 25, 2017 01:23 AM2017-04-25T01:23:38+5:302017-04-25T01:23:38+5:30
लोकमत सखी मंच आयोजित पॉवर बाय बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ मोठ्या उत्साहात पार पडला.
नवी मुंबई : लोकमत सखी मंच आयोजित पॉवर बाय बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ मोठ्या उत्साहात पार पडला. शनिवारी वाशीतील शिवविष्णू मंदिर सभागृहात झालेल्या महोत्सवाला महिलावर्गाचा उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी मेहंदी, वेषभूषा, ब्रायडल मेकअप तसेच एकल नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बिर्ला सनलाइफ इन्शुरन्सच्या वतीने स्वाभिमान या विशेष मोहिमेंतर्गत महिलांना सशक्तीकरणाचे धडे देण्यात आले.
सखींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धाआणि आकर्षक बक्षिसांची लयलूट हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. कला, नृत्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. यामध्ये कोरिओग्राफर प्रबुध कदम, दीपक चारी, दैवतामाने या परीक्षकांचा समावेश होता. एकल नृत्याकरिता ५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. या स्पर्धेत विद्या घारे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर तन्वी हारका यांनी दुसरा क्रमांक आणि विद्या अदमान यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. ब्रायडल मेकअपसाठी स्पर्धकांना अर्ध्या तासाचा कालावधी देण्यात आला होता. या स्पर्धेत अलका गोविंद या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या तर नयना शर्मा द्वितीय आणि मयुरी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. मेहंदी स्पर्धेत राजश्री नायडू यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर कीर्ती बागुल यांनी द्वितीय आणि सुवर्णा धारिया यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. वेषभूषा स्पर्धेत वैशाली मुके यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर प्रणिता मालेकर यांना दुसऱ्या आणि अनिता माळी यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या कार्यक्रमात लोकमत सखी मंच परिवारातील महिला सभासदांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत विविध कला सादर केल्या. सखी मंचच्या माध्यमातून मिळालेल्या व्यासपीठामुळे सखींनी लोकमतचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमादरम्यान बिर्ला सनलाइफ इन्शुरन्सच्या वतीने स्वाभिमान ही विशेष मोहीम राबविण्यात आली. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल. कुटुंबाला आर्थिक हातभार लावून स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी स्वत:चे अनुभव मांडत इतर महिलांना करिअर घडविण्याची प्रेरणा दिली. उपस्थित महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ तसेच प्रश्नमंजूषाच्या माध्यमातून बक्षिसे जिंकण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती. बिर्ला सनलाइफच्या वतीने महिलांना प्रेरणा देण्याकरिता विशेष चित्रफीत या ठिकाणी दाखविण्यात आली. या समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना सशक्तीकरणाचे धडे देत एक उत्तम करिअर घडविण्याचा मोलाचा सल्ला दिला. चैतन्य जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.