नवी मुंबईत वासुदेव आला, स्वच्छतेचा संदेश दिला; नऊ महिन्यांनंतर दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:57 AM2021-01-30T01:57:52+5:302021-01-30T01:58:02+5:30
शुक्रवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घणसोली गावच्या गावदेवी मंदिरापासून ‘वासुदेव आला हो.. वासुदेव आला,’ म्हणत वासुदेवाचे स्वच्छतेचा संदेश देतो
नवी मुंबई : ‘वासुदेव आला हो.. वासुदेव आला’ असं म्हणत पहाटेच्या गुलाबी थंडीत वासुदेव दाराशी आला. भगवा डगला, भगवं धोतर, मोरपिसं लावलेली त्रिकोणी टोपी. त्या टोपीला रुद्राक्षांच्या माळा गुंडाळलेल्या. कपाळावर एक पांढरा आकडा. आकड्याच्या मध्ये शेंदरी टिळा अशा वेषभूषेतील वासुदेवाचे नऊ महिन्यांनंतर शुक्रवारी नवी मुंबईकरांना दर्शन झाले.
शुक्रवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घणसोली गावच्या गावदेवी मंदिरापासून ‘वासुदेव आला हो.. वासुदेव आला,’ म्हणत वासुदेवाचे स्वच्छतेचा संदेश देत आपल्या पहाडी आवाजात टाळ आणि चिपळ्यांची साथ देत दारोदारी हिंडताना दर्शन झाले.
स्वच्छतेचा संदेश जगभरात पोहोचविणारे संत गाडगेबाबा, महात्मा गांधीजी यांच्या नावाचा उल्लेख करून ताई, माई, आई, दादा, बाबा करीत संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माउली यांच्या अभंगांच्या चालीवर वासुदेव संदेश देत होता.
ना घर, ना दार, भटके समाज म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी गावागावांत पहाटे चार वाजताच्या ठोक्याला पोचावे लागते तेव्हा आमच्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरते, असेही वासुदेवाने सांगितले.
समाजाची झाली दशा
पूर्वीच्या काळात अंगणात वासुदेव आला की, भाग्याची गोष्ट मानली जात असे. कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे, अशी काही लोकांची धार्मिक भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात वासुदेव हा समाजप्रबोधन करणारा समाज अशी त्यांची ओळख होती. परंतु आज या समाजाची पार दशा झाल्याचे वासुदेवाने सांगितले.
गाण्यातून लोकप्रबोधन
मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या वासुदेवाने आपले घरदार आणि शहर स्वच्छ ठेवण्याचे गाण्यातून लोकप्रबोधन करत पालिकेच्या स्वच्छता अभियानाला हातभार लावला.