वसुंधरा अभियानावर पुन्हा नवी मुंबईचा ठसा; क वर्ग महानगरपालिकांमध्ये पहिला क्रमांक
By नामदेव मोरे | Published: June 5, 2023 07:29 PM2023-06-05T19:29:08+5:302023-06-05T19:29:25+5:30
सलग तिसऱ्या वर्षी अभियानावर नवी मुंबईने ठसा उमठविला आहे.
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानामध्ये क वर्ग महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचा राज्यात पहिला क्रमांक आला आहे. सर्व प्रवर्गांमधील महानगरपालिकांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. सलग तिसऱ्या वर्षी अभियानावर नवी मुंबईने ठसा उमठविला आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त माझी वसुंधरा अभियानातील विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. मुंबई मधील एनसीपीएमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला क वर्ग महानगरपालिकेमधील पहिला व सर्व मनपा प्रवर्गातील दुसरा क्रमांक देऊन सन्मानीत करण्यात आले. महानगरपालिकेने नवी मुंबई पर्यावरणशील शहर बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. घनकचरा व्यवस्थापनामध्येही अधुनीक तंत्राचा वापर केला जात आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून खत व इतर वस्तूंची निर्मीती केली जात आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना दिली जात आहे.
प्लास्टीकविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. वृक्षसंवर्धनाकडेही विशेष लक्ष दिले जात असून दोन वर्षात २ लाख लाखांहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. कमी जागेत जास्त हिरवळ निर्माण करण्यासाठी मियावाकी पद्धतीचे जंगल तयार करण्यावर भर दिला आहे. रस्ते दुभाजकामध्येही हिरवळ विकसीत केली आहे. बहुतांश सर्व रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले आहे. महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमांची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, शंभूराज देसाई, प्रवीय दराडे उपस्थित होते. आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे उपस्थित होते.
मियावाकी जंगल - महानगरपालिकेने कोपरखैरणेतील निसर्ग उद्यानात मियावाकी पद्धतीने ६२ हजार वृक्षा लावले आहेत. ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे १ लाख २३ हजार वृक्ष लावले आहेत.
शहरात ३९ टक्के हरीत क्षेत्र
मनपा कार्यक्षेत्रामध्ये उद्याने, हरित पट्टे, दुभाजक व मोकळ्या भूखंडावरील वृक्षारोपणाचा आकडा २२५ पेक्षा जास्त आहे. प्रत्येक विभागात उद्याने विकसीत केली आहेत.
ई वाहनांना प्रोत्साहन - महानगरपालिका परिवहन उपक्रमात १८० इलेक्टीक बसेसचा समावेश आहे. शहरभर युलू ई बाईक उपलब्ध करून दिल्या आहेत. २० ठिकाणी चार्जींग स्टेशनची सुविधा उपलब्ध केली जात आहे.
प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग - शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उद्याने व एमआयडीसीतील उद्योगासाठी उपयोग केला जात असून अशाप्रकारे पाण्याचा उपयोग करणारी नवी मुंबई एकमेव मनपा आहे.
प्रतिक्रिया - महानगरपालिकेला क वर्गात प्रथम व सर्व प्रवर्गातील दुसरा क्रमांक मिळाला आहे. हा बहुमाण पर्यावरण प्रेमी नवी मुंबईकरांच्या सातत्यपूर्ण कामाचे फलीत असून हा पुरस्कार सर्व नागरिकांना समर्पीत करत आहोत. - राजेश नार्वेकर, आयुक्त महानगरपालिका