नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी भाजीपाल्याचा दुष्काळ अद्याप संपलेला नाही. उत्पादनच कमी होत असल्यामुळे मुंबई बाजार समितीमध्येही तुटवडा निर्माण झाला असून, बाजारभाव दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये फरसबी, वाटाणा, दोडक्याचे दर १६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. इतर अनेक भाज्यांनीही शंभरी ओलांडली असून, पुढील एक महिना तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी ४८३ ट्रक, टेम्पोमधून २२४२ टन भाजीपाल्याची आवक झाली असून, यामध्ये ४ लाख ६० हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. गाजर १३५ टन, कोबी १६९ टन व टोमॅटोची १८३ टन आवक झाली आहे. या तीन भाज्या वगळता इतर सर्वच भाज्यांची आवक प्रचंड घसरली आहे. फरसबीची आवक फक्त आठ टन झाली आहे. बाजार समितीमध्ये १०० ते १२० व किरकोळ मार्केटमध्ये १४० ते १६० रुपये किलो दराने फरसबी विकली जात आहे. वाटाण्याची आवकही ८३ टन झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये वाटाणा १०० ते १२० व किरकोळ मार्केटमध्ये १६० रुपये किलो दराने विकला जात आहे.
निवडणुकीच्या काळात कांद्याचे दर घसरले होते. परंतु, आता कांदा दरामध्येही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. बाजार समितीमध्ये कांद्याचे दर १६ ते २६ रुपये किलोवरून २१ ते २९ रुपयांवर पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्ये कांदा ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. पावसाळा सुरू होताच भुईमूग शेंगांना मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये ४० ते ७० रुपयांवरून ६० ते ९० रुपये किलोंवर शेंगांचे दर पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्ये १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.कोथिंबिरीची आवक वाढली
गुरुवारी कोथिंबिरीची आवक १ लाख ८५ हजार जुड्यांवर पोहोचली होती. यामुळे होलसेलमध्ये बाजारभाव २० ते ६० वरून २० ते ३० रुपयांवर आले आहेत. पालकच्याही १ लाख ४४ हजार जुडी विक्रीसाठी आल्या असून, इतर पालेभाज्यांची आवक अद्याप कमीच आहे.
पाऊस प्रमाणात पडला तर पुढील एक महिन्यात भाजीपाल्याचे उत्पादन वाढून दर नियंत्रणात येतील. परंतु, पाऊस मुसळधार कोसळला तर पुन्हा उत्पादनावर परिणाम होऊन भाजीपाल्याचे दर तेजीतच राहण्याची शक्यता आहे. - स्वप्निल घाग, भाजीपाला व्यापारी
बाजार समिती व किरकोळ मार्केटमधील प्रतिकिलो भाव
वस्तू - होलसेल - किरकोळकांदा - २१ ते २९ - ४०फरसबी - १०० ते १२० - १४० ते १६०वाटाणा १०० ते १२० - १४० ते १६्०भुईमूग शेंगा - ६० ते ९० - ८० ते १००भेंडी ५५ ते ७० - ८० ते १००गवार - ७५ ते ८५ - १२० ते १४०घेवडा ७५ ते ८५ - १४० ते १६०ढोबळी मिरची ५० ते ६० - ८० ते १००शेवगा शेंग ६० ते ८० - १०० ते १२०