उल्हासनगर : महापालिका भाजी मार्केटची दुर्दशा झाल्याने ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. कॅम्प नं-४ मधील मार्केटसाठी निविदा काढल्या असून दरमहा एक लाख भाडे मिळण्याची शक्यता मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी व्यक्त केली आहे. उल्हासनगर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून प्रत्येक कॅम्पनिहाय भाजी मंडईसह मटण-मासे मार्केट बांधले आहे. मात्र, त्यांची वेळोवेळी दुरुस्ती व नूतनीकरण न झाल्याने ती धोकादायक झाली आहेत. पालिकेने बीओटी तत्त्वावर भाजी मंडई विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला सर्वपक्षीय विरोध झाल्याने दरमहा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, भाजी मंडईची निविदा गेल्या आठवड्यात काढली आहे.पालिकेने २० वर्षांपूर्वी उल्हासनगर रेल्वे स्टेशनलगत मच्छी मार्केट बांधले आहे. मात्र, ते वापराविना पडून असून विक्रेते रस्त्यावर बसून विक्री करीत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नव्याने मासळी मार्केट बांधून त्यामध्ये विक्रेत्यांना गाळे देण्याचा निर्णय आयुक्त मनोहर हिरे यांनी घेतला आहे. तसेच भाजी मंडई भाडेतत्त्वावर देऊन पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेऊन त्याबाबत टप्प्याटप्प्यांनी निविदा काढण्यात येणार आहेत. शहरातील कॅम्प नं-१, भाजी मंडईतील ८४ पैकी ३३ गाळे बंद आहेत. कॅम्प नं-२ मधील ३२ पैकी ११ गाळे, कॅम्प नं-३ मधील १८१ पैकी ११३ गाळे तर कॅम्प नं-५ मधील ६५ पैकी १४ गाळे बंद आहेत. एकूण ३६२ पैकी १७१ गाळे बंद असून ३५ ते ४० गाळे जमीनदोस्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. महापालिकेच्या सर्वच भाजी मंडयांना गळती लागली असून दुरुस्तीअभवी त्या धोकादाय ठरल्या आहेत.त्यामुळे तुर्तास तरी बंदच आहेत. (प्रतिनिधी)
निविदेद्वारे भाजी मार्केट भाडेतत्त्वावर
By admin | Published: November 26, 2015 1:36 AM