भाजी मार्केट पडणार आगीच्या भक्षस्थानी
By admin | Published: May 23, 2017 02:04 AM2017-05-23T02:04:57+5:302017-05-23T02:04:57+5:30
एपीएमसीच्या विस्तारित भाजी मार्केटमध्ये अग्निशमन विभागाचे सर्व नियम पायदळी तुडविण्यात येत आहेत. गाळ्यांमध्ये सर्वत्र कागदी पुठ्ठ्यांचे ढिगारे ठेवण्यात आले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : एपीएमसीच्या विस्तारित भाजी मार्केटमध्ये अग्निशमन विभागाचे सर्व नियम पायदळी तुडविण्यात येत आहेत. गाळ्यांमध्ये सर्वत्र कागदी पुठ्ठ्यांचे ढिगारे ठेवण्यात आले आहेत. या ढिगाऱ्यांमध्येच परप्रांतीय कामगार स्टोव्हचा वापर करून स्वयंपाक करत आहेत. विडी, सिगारेट व गांजा ओढत असून यामुळे मार्केटला आग लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाजार समितीच्या मूळ भाजी मार्केटमधील बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने विस्तारित भाजी मार्केटची निर्मिती केली. पाच वर्षापूर्वीच या मार्केटचे लोकार्पण करण्यात आले. पण व्यापाऱ्यांनी अनेक अडचणी सांगून प्रत्यक्ष व्यापार करणे थांबविले व पुन्हा जुन्या मार्केटमध्ये गाळे भाडेतत्वावर घेवून व्यापार करण्यास सुरवात केली. नवीन मार्केटमधील गाळे निर्यातदारांना व इतर व्यावसायिकांना भाड्याने दिले आहेत. निर्यातदार या गाळ्यांचा वापर पॅकिंगसाठी करू लागले आहेत. या कामासाठी मोठ्याप्रमाणात परप्रांतीय कामगारांना बेकायदेशीरपणे आश्रय देण्यात आला आहे. कामगार गाळ्यांमध्येच वास्तव्य करत आहेत. पॅकिंगसाठी आणलेले कागदी पुठ्ठ्यांचे ढिगारे मार्केटमध्ये सर्वत्र ठेवण्यात आले आहेत. या ढिगाऱ्याला लागूनच कामगार स्टोव्हचा वापर करून स्वयंपाक करत आहेत. स्टोव्हसाठी लागणाऱ्या रॉकेलचाही अवैधपणे साठा करण्यात आला आहे. बहुतांश कामगारांना विडी, सिगारेट व काहींना गांजा ओढण्याचे व्यसन आहे. कामगार विडी, सिगारेटची थोटके कुठेही टाकत आहेत. या सर्वांमुळे मार्केटमध्ये आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विस्तारित भाजी मार्केटमधील अग्निशमन यंत्रणा दोन वर्षापासून बंद आहे. अशा स्थितीमध्ये आग लागल्यास मोठ्या प्रमाणात वित्त जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. बाजारसमितीचे अधिकारी व कर्मचारी येथूनही अवैधपणे वसुली करत असल्याची चर्चा आहे. वैयक्तिक लाभासाठी येथील अनागोंदी कारभाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.
गाळे भाड्याने घेतलेल्या निर्यातदार व इतर व्यावसायिकांना स्वत:चे काम कमी पैशात व्हावे असे वाटत आहे. यामुळे परप्रांतीय कामगारांना अल्प मजुरीमध्ये राबवून घेत असून त्यांना राहण्यासाठी गाळ्यामध्ये जागा उपलब्ध करून देत आहेत. परंतु यामुळे मार्केटची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे दिसत असूनही सर्वच घटक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.
विस्तारीत भाजी मार्केटमधील स्थिती
एपीएमसीची अग्निशमन यंत्रणा दोन वर्षापासून बंद
विद्यूत बॉक्स व मिटर रूमची दुरावस्था
गाळ्यांमध्ये सर्वत्र कागदी पुट्यांचे ढिगारे
कागदपी पुट्यांच्या बाजूलाच स्टोव्ह च्या सहाय्याने स्वयंपाक
गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे रॉकेलची साठेबाजी
कामगार बिडी, सिगारेट ओढून थोटके मार्केटमध्ये टाकतात
आग लागल्यास सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना नाही