पनवेल : स्मशानभूमीत जाण्यास सर्व जण घाबरत असतात. या ठिकाणाला अपवित्रही मानले जाते. मात्र, पनवेलमधील तक्का येथील स्मशानभूमीत याच गावातील रहिवासी गणेश वाघीलकर यांनी बाग फुलवली असून, या ठिकाणी विविध प्रकारच्या भाज्या, तसेच विविध प्रकारची फुलझाडांची लागवड करून स्मशानभूमीच्या नंदनवनाचे स्वरूप दिले आहे.तक्क्यामधील राजस्थानी मारवाडी स्मशानभूमीत हे नंदनवन फुलविण्याचे काम करण्यात आले आहे. गावाजवळ असलेल्या या स्मशानभूमीची देखरेखीचे काम वाघिलकर २०१३ पासून करत आले आहेत. गाढी नदीच्या तीरावर १४ गुंठ्याच्या परिसरात ही स्मशानभूमी असून, या ठिकाणी निम्मी जागा पडीक होती. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची आवड असलेल्या वाघीलकर यांनी येथे सजावटीसाठी झाडे लावण्यास सुरुवात केली. त्यात फणस, आंबा, पपई, लिंब, बोर, पेरू आदींसह लहान मोठी अनेक झाडे आहेत. या व्यतिरिक्त भोपळा, टोमॅटो, वांगी, गवती चहा, घोसाळी, मिरची आदींची फळझाडेही आहेत. या परिसराची शोभा वाढविण्यासाठी जास्वंद, गुलाब, प्राजक्त, रातराणी झाडेही लावण्यात आली आहेत.या कामामुळे मला मानसिक समाधान मिळते. त्यातच एक प्रकारे शेतीची आवडही जोपासली जाते. कोणी भाजीची मागणी केल्यास ती आवर्जून त्यांना देतो.- गणेश वाघिलकर
तक्का स्मशानभूमीत भाजीचा मळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 11:28 PM