नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एमपीएमसी) पावसामुळे वाढलेले भाजीपाल्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. वाढलेली आवक व ग्राहकांनी खरेदीकडे फिरवलेली पाठ यामुळे दर कमी झाले आहेत. फरसबी, शेवगा, वाटाण्यासह पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. कोथिंबीरसह पालेभाज्यांचे दरही कमी होऊ लागले आहेत.
बाजार समितीमध्ये शुक्रवारी ६२८ ट्रक, टेम्पोमधून २९१४ टन भाजीपाल्यांची आवक झाली आहे. यामध्ये ५ लाख ३९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. सातारा, पुणे, सांगली, नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून व दक्षिणेकडील राज्यांमधूनही भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळे व बाजारभाव वाढल्यामुळे ग्राहकांनी भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरविली आहे. ग्राहक कमी असताना आवक अचानक वाढल्यामुळे बाजार समितीमध्ये भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. एक आठवड्यापूर्वी ८० ते ९० रुपये किलो दराने विकला जाणारा मुळा आता ३० ते ४० रुपयांवर आला आहे. वाटाण्याचे दर १६० ते २०० वरून ७० ते ९० रुपयांवर आले आहेत. फरसबीचे दर ८० ते ९० वरून ५० ते ५६ रुपयांवर आले आहेत. शेवगा शेंग, दोडका, मिर्ची, कारली, फ्लॉवर यांचे दरही कमी झाले आहेत.
पावसामुळे भाजीपाला खराब
कोथिंबीर, शेपू, कडीपत्ता, मेथीचे दरही कमी झाले आहेत. पावसामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले असून बाजार समितीमध्ये टाकून दिलेल्या भाजीपाल्याचे ढीग पहावयास मिळत आहेत. किरकोळ मार्केटमध्ये विक्रीसाठी नेलेल्या मालामध्येही खराब मालाचे प्रमाण वाढत आहे.
टोमॅटोची तेजी कायम
भाजीपाल्याचे दर कमी होण्यास सुरुवात झाली असताना टोमॅटोच्या दरामध्ये मात्र प्रचंड वाढ होत आहे. एक आठड्यापूर्वी बाजार समितीमध्ये २० ते ४२ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता ६० ते ७० रुपयांवर पोहचला असून किरकोळ मार्केटमध्ये १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
एमपीएमसीमधील दर
वस्तू १२ जुलै १९ जुलै
भेंडी ३२ ते ५० १६ ते २६
फरसबी ८० ते ९० ५० ते ५६
फ्लॉवर २० ते २६ १६ ते २२
काकडी २० ते ३६ १४ ते २२
कारले ४० ते ४६ २५ ते ३५
ढोबळी मिर्ची ३५ ते ४५ १५ ते २५
शेवगा शेंग ७० ते ९० ६० ते ८०
दोडका ३० ते ३६ १५ ते २५
टोमॅटो २० ते ४२ ६० ते ७०
वाटाणा १६० ते २०० ७० ते ९०
मिर्ची ६० ते ८० २५ ते ६०
मुळा ८० ते ९० ३० ते ४०