नवी मुंबई : मुंबई बाजार समितीमध्ये काही दिवसांपासून आवक घसरू लागल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढू लागले आहेत. कोथिंबीरसह पालेभाज्यांचे दर वाढल्यामुळे ग्राहक चिंतेत असले, तरी चांगला भाव मिळू लागल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे.हिवाळ्यामध्ये बाजार समितीमध्ये रोज ६०० ते ७०० ट्रक व टेम्पोमधून भाजीपाल्याची आवक होऊ लागली होती. यामुळे बाजारभाव कोसळले होते. वांगी, फ्लॉवरसह इतर वस्तूंची विक्री न झाल्यामुळे माल फेकून देण्याची वेळ आली होती. मुंबईमध्ये मोठ्या अपेक्षेने भाजीपाला पाठविणाºया शेतकºयांचे नुकसान होऊ लागले होते; परंतु गत आठवड्यापासून आवक कमी झाली असल्याने बाजारभाव वाढू लागले आहेत. २१ जानेवारीला होलसेल मार्केटमध्ये ८ ते १८ रुपयांना कोथिंबीरची जुडी विकली जात होती. एक आठवड्यात हेच दर १५ ते ४० रुपये झाले आहेत. मेथीचे दर ८ ते १६ रुपयांवरून १० ते २० रुपये जुडी झाले आहेत. शेपूचे दर ८ ते १४ रुपयांवरून थेट १० ते २५ रुपये जुडी असे झाले आहेत.दुधी भोपळ्याचे दर ८ ते १६ रुपये किलोवरून थेट १४ ते २४ रुपये झाले आहेत. फ्लॉवर, चवळी शेंग, फ्लॉवर, गाजर, गवार, घेवडा, शिराळी दोडका, टोमॅटो, वांगी, वाटाणा यांच्या दरामध्येही वाढ झाली आहे. राज्यभर दुष्काळी स्थिती असल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ लागला आहे, यामुळे मार्केटमधील आवक कमी होत आहे. सद्यस्थितीमध्ये नाशिक, पुणे, सातारा, गुजरात, कर्नाटक व इतर ठिकाणांवरून भाजीपाल्याची आवक होत आहे.एक आठवड्यापासून आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव काही प्रमाणात वाढले आहेत. आवक सुरळीत झाली की भाव नियंत्रणात येतील.- शंकर पिंगळे, व्यापारी प्रतिनिधीकाही दिवसांपासून मार्केटमध्ये मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. एपीएमसीमध्ये माल कमी असल्यामुळे बाजारभावावर त्याचा परिणाम झाला आहे.- बाबू घाग,विक्रेते, नेरुळ
भाजीपाल्याचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:37 PM