नवी मुंबई : बेलापूरमधील कोकण भवन इमारतीच्या शेजारी असलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीखाली असलेल्या मोकळ्या भूखंडावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी असलेला नाला आणि भूखंडाशेजारी डम्पिंग केले जात असल्याने हा परिसर दुर्गंधीयुक्त झाला आहे. अशा अस्वच्छ ठिकाणी दररोज भाजीपाला, तसेच फळांची विक्री केली जाते. या ठिकाणी असलेल्या वाहनतळाच्या जागेवरही फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे चित्र पाहायला मिळते.कोकणभवन, सिडको तसेच बेलापूर रेल्वेस्थानक परिसरात दिवसाला शेकडो नागरिक ये-जा करत असतात. नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या कोकण भवन परिसरात परगावाहून कामानिमित्त येणाºया नागरिकांनाही या फेरीवाल्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सकाळी कार्यालयीन वेळेत या परिसरातून मार्ग काढणे मुश्कील असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. उघड्या नाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नाकाला रुमाल लावून मार्ग काढण्याशिवाय पर्याय उरत नसल्याची प्रतिक्रिया कर्मचारी मालती पांचाळ यांनी व्यक्त केली. संध्याकाळच्या वेळी या परिसरात मासळी विक्रेत्यांकडून जागेची अडवणूक केली जाते. अतिक्रमणावर ठोस कारवाई होत नसल्याने निर्भयपणे जागेचा वापर केल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक विक्रेत्यांनी या ठिकाणी उघड्यावर हॉटेल थाटले असून, पार्किंगच्या जागेवर खुर्च्या आणि टेबल मांडले आहेत. परिसरात माशांचे प्रमाण वाढले असून, विक्रेते या ठिकाणीच कचरा टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्यामुळे रोगराईला आमंत्रण दिले जात असून, नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे या परिसरातील समस्यांची वाढ होत आहे. भाजी, फळविक्रेत्यांवर पालिकेची ठोस कारवाई होत नसल्याने फेरीवाले सर्रासपणे या ठिकाणी बस्तान मांडत असल्याचा प्रकार पाहायला मिळतो. सर्वसामान्य नागरिक, तसेच प्रवाशांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचे सत्र सुरू असताना, या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांना अभय का दिले जात आहे? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कामानिमित्त येणाºया नागरिकांना या ठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसून, या पार्किंगच्या जागेवरही फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे.ठोस कारवाई न केल्याने दुसºया दिवशी पुन्हा या ठिकाणी व्यवसाय करण्याचे धाडस या फेरीवाल्यांमध्ये पाहायला मिळते. पुन्हा तीच परिस्थिती उद्भवत असून, पदपथावरील जागेवरही या फेरीवाल्यांनी जागा अडविली आहे.ऐन कार्यालयीन वेळेतही या ठिकाणी पदपथावर असलेल्या विक्रेत्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी.
नाल्याशेजारी भाजीपाला, फळांची होतेय विक्री, कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:51 AM