नवी मुंबई : मुंबईमध्ये कांद्यासह भाजीपाल्याचे दरही वाढू लागले आहेत. एपीएमसीमध्ये कांदा ४२ ते ४७ रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये हे दर ६० रुपयांवर गेले आहेत. हिरवा वाटाणा तब्बल १६० रुपये किलो दराने विकला जात असून लसूणची किंमतही १८० ते २०० रुपयांवर गेली आहे.राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईमधील भाजीपाल्याच्या आवकवर झाला आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढत आहेत. शुक्रवारी बाजार समितीमध्ये १४०० टन कांदा व २०८ टन लसूणची आवक झाली. या दोनही वस्तूंचे दर प्रतिदिन वाढत चालले आहेत. होलसेल मार्केटमध्ये कांदा ४२ ते ४७ रुपये किलो दराने विकला जात आहे. किरकोळ मार्केटमध्ये हे दर ६० रुपयांवर गेले आहेत. काही ठिकाणी यापेक्षाही जास्त दराने कांदा विकला जात आहे. मुंबईमध्ये पुणे व नाशिकमधून आवक होत आहे. पुढील काही दिवसांमध्ये कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. शासनाने वेळेत उपाययोजना करावी व मार्केटमध्ये मागणी व पुरवठा यामधील तफावत दूर करावी, अशी मागणी ग्राहकही करू लागले आहेत.भाजीपाल्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. गत आठवड्यामध्ये १५ ते ३६ रुपये किलो दराने विकली जाणारी भेंडी २६ ते ४० रुपयांवर गेली आहे. फरसबी ३० ते ५० वरून ४५ ते ६५ रुपये, वाटाणा ६५ ते ७५ रुपयांवरून ८० ते १०० रुपये झाला आहे. टोमॅटो सोडल्यास इतर सर्व भाज्यांचे दर वाढत आहेत.
मुंबईत कांद्यासह भाजीपाला महागला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 5:50 AM