- नामदेव मोरेनवी मुंबई : राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. मिरची, वाटाणा, फरसबी, घेवडा यांनी शंभरी ओलांडली आहे. टोमॅटोची आवकही राज्यात सर्वत्र कमी असून भाव वाढले आहेत. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो २५ ते ५० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ७० ते १०० रुपये किलो दराने विकले जात आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक सोमवारी ६०० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पोमधून भाजीपाल्याची आवक होत असते. मात्र, या सोमवारी पावसामुळे फक्त ५६७ वाहनांची नोंद झाली. पावसामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. खराब झालेला माल फेकून द्यावा लागतो. किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केलेल्या मालामध्येही १० ते २० टक्के खराब माल असल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत.
मार्केटमध्ये २६५ टन टोमॅटोची आवक झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांना खराब माल काढून टाकावा लागत असून उरलेल्या मालाची विक्री करावी लागत असल्याने टोमॅटोचे दर किरकोळ मार्केटमध्ये ७० ते १०० रुपये झाले आहेत.
हिरव्या मिरचीचा तुटवडाहिरव्या मिरचीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. होलसेल मार्केटमध्ये मिरची ४० ते ५५ रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १२० रुपयांवर पोहोचली आहे. वाटाणा १०० ते १२० रुपये, घेवडा १०० ते १२०, फरसबी १०० ते १२० रुपये किलो दराने किरकोळ मार्केटमध्ये विक्री होत आहे.
प्रमुख मार्केटमधील टोमॅटोचे प्रतिकिलो दरमार्केट प्रतिकिलो दर पुणे ३६ ते ५५औरंगाबाद ५५ ते ६५श्रीरामपूर २० ते ७०नागपूर ४० ते ८०