भाज्या, फळे, फुले, गहू २०४ देशांमध्ये सुपरहिट, वर्षभरात ४ कोटी ४४ लाख टन निर्यात
By नामदेव मोरे | Published: June 12, 2023 10:50 AM2023-06-12T10:50:31+5:302023-06-12T10:50:49+5:30
२ लाख २० हजार कोटींची उलाढाल
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : भारतीय कृषीमालाला जगभरातून मागणी वाढत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात २०४ देशांमध्ये विविध प्रकारचा कृषीमाल निर्यात करण्यात आला आहे. तब्बल ४ कोटी ४४ लाख टन निर्यात झाली असून, त्यामधून २ लाख २० हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा १६ लाख टन जादा निर्यात झाली असून, उलाढालही ३६ हजार १७३ कोटींनी वाढली आहे.
भारतीय कृषीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी शासनाच्या माध्यमातून निर्यातीला प्रोत्साहन दिले जात आहे. अपेडा व पणन मंडळाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या प्रयत्नांना यश येऊ लागले असून, वर्षनिहाय निर्यात वाढत आहे. २०२०-२१ या वर्षात ३ कोटी २१ लाख टन कृषी मालाची निर्यात झाली होती. यामधून १ लाख ५३ हजार कोटींची उलाढाल झाली होती. २०२१-२२ मध्ये ४ कोटी २७ लाख टन निर्यात होऊन १ लाख ८४ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. २०२२-२३ या आर्थिक वर्षात निर्यातीचा नवीन उच्चांक तयार झाला आहे. ४ कोटी ४४ लाख टन कृषी मालाची निर्यात झाली असून, २ लाख २० हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षभरात जवळपास २०४ देशांमध्ये कृषीमालाची निर्यात झाली आहे.
वर्षभरात फुले, फळे व भाजीच्या बियांच्या निर्यातीमधून १५३४ कोटींची निर्यात झाली आहे. १३१८५ कोटी रुपयांची फळे व भाजीपाला विदेशात पाठविण्यात आला आहे. प्रक्रिया केलेल्या फळे व भाजीपाल्याच्या वस्तूंनाही मागणी वाढत असून, गतवर्षी या व्यापारातून १८०९० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
तांदळाची सर्वाधिक निर्यात- ४५ लाख ५८ हजार टन बासमती तांदूळ निर्यात झाला असून, ३८५३४ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. १ कोटी ७७ लाख टन इतर तांदूळ निर्यात झाला असून, ५१०८८ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.
गहू निर्यात किंचित घटली- २०२१-२२ मध्ये रशिया व युुक्रेन युद्धामुळे भारतीय गव्हाला जगभर मागणी वाढली होती. ७२ लाख टन गव्हाची निर्यात होऊन १५८४० कोटींची उलाढाल झाली होती. २०२२-२३ मध्ये ४६ लाख ९३ हजार टन गव्हाची निर्यात झाली असून, ११८२६ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
२०२२-२३ मधील निर्यात
प्रकार निर्यात(टन) किंमत (कोटी)
धान्य ३०६६४८६० १११०६२
फळे व भाजीपाला ४३३५६७५ १३१८५
प्रक्रियायुक्त भाजी, फळे १९१०८४८ १८०९०
प्राणिजन्य वस्तू २०२२३९० ३२५९७
प्रक्रिया केलेल्या वस्तू ५४१८११० ४१४८९
फुले व फळभाजी बिया ३४६३० १५३४
सुकामेवा ७६८२४ २९८२
२०२१-२२ मधील निर्यात
प्रकार निर्यात(टन) किंमत(कोटी)
धान्य ३२३०१७९१ ९६०११
फळे व भाजीपाला ३३७६२४८ ११४१२
प्रक्रियायुक्त भाजी, फळे १५८६२५५ १२८५८
प्राणिजन्य वस्तू १७१३७२३ ३०९५३
प्रक्रिया केलेल्या वस्तू ३६७०३२४ २८६०१
फुले व फळभाजी बिया ३५१४७ १५२२
सुकामेवा ८०३६६ ३४०९