भाज्यांनी गाठली शंभरी, गवार, वाटाणा १६० रुपयांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 06:50 AM2022-07-26T06:50:44+5:302022-07-26T06:51:10+5:30
बाजार समितीमध्ये सोमवारी ६५१ वाहनांमधून २६ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी बाजारभाव गगनाला भिडू लागले आहेत. जवळपास सर्वच भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. वाटाणा १४० ते १६० रुपये किलो व गवार १०० ते १६० रुपये किलो दराने विकली जात असून एक जुडी पालेभाजीसाठी २५ रुपये मोजावे लागत आहेत.
बाजार समितीमध्ये सोमवारी ६५१ वाहनांमधून २६ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ६४ हजार जुडी पालेभाज्यांचाही समावेश आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी साधारणत: तीन हजार टन कृषिमालाची व ५ ते ७ लाख जुडी पालेभाज्यांची विक्री होत असते. आवक कमी झाली असल्यामुळे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भेंडी, गवार, घेवडा, ढोबळी मिरची, राजमा, तोंडली, दुधी या भाज्यांचे दर प्रतिकिलो शंभरपेक्षा जास्त झाले आहेत. कोथिंबिरीसह पालेभाज्यांचेही दर वाढले आहेत. सर्वच भाज्यांचे दर वाढत असताना टोमॅटोने मात्र ग्राहकांना दिलासा दिला आहे. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो १६ ते २२ रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटो ३० ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे.
पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला असल्यामुळे बाजार समितीमध्ये आवक कमी होत आहे. आवक कमी असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. इतर भाज्यांचे दर वाढत असताना टोमॅटोचे दर नियंत्रणात आहेत.
- स्वप्निल घाग, भाजीपाला विक्रेते
भाजीपाल्याचे दर
भाजीपाला १८ जुलै २५ जुलै
बीट १६-२४ २४-२८
भेंडी ३०-४५ ३०-७५
फरसबी ५५-७५ ६०-९०
गवार ५०-८० ६० ते ९०
घेवडा ४५-७५ ५०-७५
ढोबळी मिरची ३०-४४ ३५-६०
दोडका ३५-५० ४०-७०
वाटाणा ८०-१०० ९०-११०
तोंडली ३०-८० ३०-१००
दुधी भोपळा ३० ते ५० ३० ते ६०