नेरूळमध्ये पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याने वाहनांमध्ये बिघाड; सेक्टर ७ येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 12:28 AM2020-11-30T00:28:13+5:302020-11-30T00:28:30+5:30

नागरिकांच्या तक्रारीनंतर पाणी काढले

Vehicle breakdown due to water mixed with petrol in Nerul; Incident at Sector 7 | नेरूळमध्ये पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याने वाहनांमध्ये बिघाड; सेक्टर ७ येथील घटना

नेरूळमध्ये पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याने वाहनांमध्ये बिघाड; सेक्टर ७ येथील घटना

Next

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : नेरूळ येथील पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याने अनेकांची वाहने बंद पडल्याचा प्रकार रविवारी घडला. यावरून काहींनी पेट्रोल पंपाच्या टाकीची पाहणी केली असता, पेट्रोलच्या टाकीत शेकडो लीटर पाणी आढळून आले. नागरिकांच्या तक्रारीनंतर मोटर पंपाने हे पाणी बाहेर काढण्यात आले.

नेरूळ सेक्टर सेक्टर ७ येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर ही बाब उघडकीस आली. सीबीडी येथील आबा कोळेकर हे त्या ठिकाणी दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. मात्र पेट्रोल भरल्यानंतर काही अंतरावरच त्यांची दुचाकी बंद पडली. दोन महिन्यांपूर्वीच घेतलेली दुचाकी अचानक बंद पडल्याने व पुन्हा चालू होत नसल्याने त्यांनी ती कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेली. या वेळी पेट्रोलच्या टाकीत पेट्रोलऐवजी पाणी आढळून आले. त्याचवेळी इतर दोन दुचाकी त्या ठिकाणी याच कारणामुळे जमा झाल्याचे समोर आले. त्यांनीही त्याच ठिकाणी पेट्रोल भरले होते. यामुळे सर्व जण त्या ठिकाणी गेले असता पंपावरील कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला बाब नाकारली. अखेर वाहनधारकांचा संताप अनावर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी टाकीतले पेट्रोल तपासले असता, त्यामध्येदेखील पाणी आढळून आले. यामुळे मोटर पंपाद्वारे टाकीतले पाणी उपसले असता शेकडो लीटर पाणी बाहेर निघाले. यावरून त्या ठिकाणी वाहनांमध्ये भरण्यात आलेल्या पेट्रोलमध्ये पेट्रोलऐवजी पाणीच होते ही बाब उघड झाली. या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत वाहनधारकांनी तक्रार डायरीची मागणी केली. परंतु त्यांना ती देण्यास नकार देण्यात आला. 

प्रकार नजरचुकीने घडल्याचा मॅनेजरचा दावा 
नवी मुंबईत यापूर्वी अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांमध्ये भरण्यात आलेल्या पेट्रोलमध्ये पाणी आढळल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र रविवारी घडलेला प्रकार नजरचुकीने घडल्याचे पंपाचे मॅनेजर संजीव चौधरी यांचे म्हणणे आहे. टँकरमधून पेट्रोलची वाहतूक होताना आग लागू नये म्हणून टँकरमध्ये पेट्रोलसोबत पाणी भरलेले असते. हेच पाणी पेट्रोलसोबत पंपाच्या टाकीत गेल्याने ते वाहनांमध्ये भरले गेल्याचेही सांगत त्यांनी घडल्या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकारात अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले असून या प्रकरणी कारवाईची मागणी कोळेकर यांनी केली आहे.

Web Title: Vehicle breakdown due to water mixed with petrol in Nerul; Incident at Sector 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.