नो पार्किंग झोनमध्येच वाहनांची गर्दी
By admin | Published: January 11, 2017 06:31 AM2017-01-11T06:31:29+5:302017-01-11T06:31:29+5:30
बेलापूर येथील पोलीस आयुक्तालय मार्ग, तसेच अर्बन हाट ते आग्रोळी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील नो पार्किंग झोनमध्ये सर्रासपणे गाड्या उभ्या केल्या जात आहे
नवी मुंबई : बेलापूर येथील पोलीस आयुक्तालय मार्ग, तसेच अर्बन हाट ते आग्रोळी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील नो पार्किंग झोनमध्ये सर्रासपणे गाड्या उभ्या केल्या जात आहे. दोनही बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणे.
रस्त्याच्या दोनही बाजूला गाड्या उभ्या केल्या जात असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. वाहनांमुळे रस्ता अडविला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली. नो पार्किंगचा बोर्ड लावलेल्या ठिकाणी उभ्या केलेल्या या वाहनांवर वेळोवेळी कारवाई केली जात नसल्याने वाहनचालक बेफिकीरपणे नो पार्किंग झोनमध्ये गाड्या उभ्या करत असल्याचे दिसून येते.
वाहतूक पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनही पुन्हा तीच परिस्थिती पाहायला मिळते. नो पार्किंग झोनमधील वाहनांवर रोजच कारवाई केली जात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. अर्बन हाट परिसरात स्वतंत्र पार्किंगची सोय केलेली असूनही अग्रोली तलावाच्या समोरील रस्त्यावर वाहने उभी केलेली पाहायला मिळतात. सीबीडी हायवे लगत असलेल्या अग्निशमन दलाच्या बाहेरील रस्त्यावरील अवैध पार्किंगमुळे प्रवासी हैरण झाले आहे. बेलापूर रेल्वेस्थानकालगत असलेल्या पे अॅण्ड पार्कचा वापर न करता, प्रवासी रिक्षा तळाच्या शेजारी असलेल्या जागेचा वापर वाहने उभी करण्यासाठी केला जात आहे. या मार्गावरील पादचारी तसेच इतर प्रवाशांच्या मार्गात अडथळे येत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. नो पार्किंग झोनमध्ये उभ्या केलेल्या गाड्यांवर वेळोवेळी कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)