अनंत पाटील नवी मुंबई : महापालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयासमोर असलेल्या स्मशानभूमीला वाहनांचा गराडा पडलेला असतो. परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा नसल्याने वाहनधारक स्मशानाच्या प्रवेशद्वारावरच वाहने उभी करतात. विशेष म्हणजे तिन्ही मार्गांवर वाहने पार्क केली जात असल्याने अंत्यविधीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा मृतदेह खांद्यावर घेऊन ताटकळत उभे राहावे लागते. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून स्मशानभूमीच्या परिसरातील बेकायदा पार्किंगला आळा घालण्याची मागणी केली आहे.
सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या घणसोली गावात महापालिका विभाग कार्यालयाला लागूनच जुनी स्मशानभूमी आहे. महिन्याला पंधरा ते वीस मृतदेहांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. तसेच विभाग कार्यालयात विविध कामांनिमित्त दररोज शेकडो लोक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. या कार्यालयाच्या समोरच महापालिकेचा पाण्याचा जलकुंभ आहे. दळणवळणाची सोय म्हणून या परिसरातील तिन्ही मार्गांवर नो पार्किंग क्षेत्राचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र या फलकांकडे दुर्लक्ष करीत सर्रासपणे चार चाकी व दुचाकी वाहने उभी केली जातात. अनेकदा रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केली जातात. त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूककोंडीची समस्या भेडसावते.
वाहनतळ नसल्याने स्मशानभूमीला नेहमी वाहनांचा विळखा पडल्याचे दृश्य पाहावयास मिळते. अनेकदा ही वाहने स्मशानभूमीतसुद्धा पार्क केल्याचे दिसून येते. त्यामुळे अंत्यविधी करताना ग्रामस्थांची कसरत होत आहे. स्मशानात उभ्या केलेल्या अस्ताव्यस्त वाहनांचा अडथळा पार करून मृतदेह नेताना ग्रामस्थांना संताप अनावर होत आहे. वाहनांच्या पार्किंगला एकही वाहनतळ उपलब्ध नसल्याने या ठिकाणी येणारी दुचाकी, चार चाकी वाहने रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे या भागात नेहमीच वाहतूककोंडी होते. नवी मुंबई वाहतूक पोलीस शाखेने अशा नो पार्किंगमधील वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पार्किंगची सुविधा नसल्यामुळेच याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.