निवडणुकीच्या कामकाजासाठी वाहनांची शोधाशोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:11 AM2019-04-06T02:11:24+5:302019-04-06T02:11:43+5:30
ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत निवडणूक कार्यालये सुरू झाली आहेत
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे काम जोमात सुरू आहे. त्यासाठी विविध भरारी पथके तैनात आहेत. निवडणुकीच्या या कार्यालयीन कामकाजासाठी सुमारे २५० वाहनांची आवश्यकता आहे. मात्र, अद्यापपर्यंत केवळ १७१ वाहनांचा पुरवठा तिन्ही लोकसभा मतदारसंघांच्या कार्यालयीन कामकाजासाठी झाला आहे. उर्वरित वाहनांसाठी शोधाशोध सुरू आहे.
ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत निवडणूक कार्यालये सुरू झाली आहेत. त्यासाठी जिल्हा पातळीवरील कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि साहित्य वाहतूक आदींसाठी लागण्याऱ्या अत्यावश्यक वाहनांची जुळवाजुळव केली जात आहे. सद्य:स्थितीला विविध कामांसाठी आयएएस अधिकारीही जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी या वाहनांची आवश्यकता आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १८ विधानसभा कार्यक्षेत्रांतील कार्यालयांसाठी १७१ वाहनांचा पुरवठा जिल्हा वाहनव्यवस्था पथकाकडून झाला आहे. याशिवाय, आणखी १५० वाहनांची आवश्यकता असून तशी मागणी संबंधित कार्यालयांकडून केली जात आहे.
जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या निवडणूक कार्यालयीन अधिकाऱ्यांना वाहनांची उपलब्धता सध्या प्राधान्याने करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता जिल्ह्यातील तीन प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयांवर या वाहनांच्या उपलब्धतेची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा शोध घेतला जात आहे. प्राप्त होणाºया वाहनांची योग्य ती तांत्रिक तपासणी केली जात आहे. त्यानंतर, संबंधित वाहनांचा मागणीनुसार पुरवठा करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी ठाणे, वाशी आणि कल्याण येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांंकडून वाहनांचा शोध सुरू आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार वाहने लवकरच उपलब्ध होतील, असे जिल्हा वाहनव्यवस्थापन कक्षाकडून सांगितले जात आहे.
साडेसहा हजार वाहनांची जुळवाजुळव
जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रांतील कार्यालयांसह ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा कार्यालयीन कामकाजासाठी सुमारे २५० वाहने उपलब्ध होत आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील सहा हजार ४८८ मतदानकेंद्रांसह आता नव्याने वाढणाºया साहाय्यकारी मतदानकेंद्रांवरील सुमारे ४७ हजार अधिकारी, कर्मचाºयांना मतदानाच्या आदल्या दिवसापासून वाहने उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. यासाठी सुमारे सहा हजार ७६३ वाहनांची आवश्यकता भासणार आहे. भिवंडीत मतदानकेंद्रांसाठी सुमारे दोन हजार २०० वाहनांसह कल्याण मतदारसंघासाठी दोन हजार ६३ आणि ठाण्यात मतदानाच्या दिवसाकरिता दोन हजार ५०० वाहनांची जुळवाजुळव सुरू आहे.