वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई, वसईसह २० आरटीओत वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र!

By नारायण जाधव | Published: May 10, 2023 05:01 PM2023-05-10T17:01:32+5:302023-05-10T17:01:58+5:30

मालकीच्या, एसटी महामंडळाच्या जागांना त्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

Vehicle inspection and inspection center in 20 RTOs including Navi Mumbai, Vasai to prevent increasing accidents! | वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई, वसईसह २० आरटीओत वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र!

वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई, वसईसह २० आरटीओत वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र!

googlenewsNext

नवी मुंबई : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई, वसई आरटीओ कार्यालयांसह राज्यातील २० आरटीओच्या कार्यक्षेत्रात वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्र सुरू करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. या कार्यालयांवर ३६२ कोटी ५२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मालकीच्या, एसटी महामंडळाच्या जागांना त्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सूचनेनुसार ही वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यामुळे राज्यातील आरटीओंची मोठी डोकेदुखी दूर होणार आहे. 

हे आहेत ते २० आरटीओ 
ज्या २० आरटीओंच्या कार्यालय अंतर्गत या वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्रांना मान्यता दिली आहे, त्यामध्ये अहमदनगर, धुळे, जळगाव, मालेगाव, साांगली, अकलूज, गडचिरोली, कराड, उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गोंदिया, हिंगोली, पेण, यवतमाळ, जालना, सिंधुदुर्ग, नागपूर (पूर्व) यांचाही समावेश आहे.

काय आहे वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र?
दरवर्षी रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी असून गाडी चांगल्या स्थितीत नसणे हेदेखील अपघाताचे कारण ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांची फिटनेस चाचणी अत्यंत काटेकोरपणे करणे तितकेच महत्त्वपूर्ण असते. यामुळे स्वयंचलित यंत्रणेमार्फत गाड्यांची तपासणी या वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्रांत करणे सोपे होणार आहे.

यांची होते तपासणी
फिटनेस चाचणीमध्ये गाडीचे ब्रेक, टायर, इंजिन,लाइट, आदींची संपूर्ण तपासणी करण्यात येते. त्यासाठी टेस्ट ट्रॅकवर गाडी चालवून पाहिले जात असून ती व्यवस्थित असल्यास आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येते. चाचणीच्या वेळी गाडीमध्ये काही दोष आढळल्यास वाहनचालकाला गाडीची पुन्हा फिटनेस चाचणी करावी लागते.

न्यायालयाने टोचले होते कान
फिटनेस चाचणीवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील आरटीओ अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. वाढत्या रस्ते अपघाताला विविध कारणे असले तरी गाडी सुस्थितीत नसणे, हेदेखील अपघात घडण्यामागचे महत्त्वाचे कारण असून आजही रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांची स्थिती बिकट असल्याचे दिसून येते. त्यानंतर राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने राज्यात ही वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Vehicle inspection and inspection center in 20 RTOs including Navi Mumbai, Vasai to prevent increasing accidents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.