जीएसटी विभागाकडून वाहनांची तपासणी; ई वे बिल नसलेले वाहन केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:36 PM2018-10-12T23:36:16+5:302018-10-12T23:44:06+5:30
नवी मुंबई : कोकण भवनमधील राज्य वस्तू व सेवा कर रायगड यांच्यावतीने ई वे बिल तपासणीसाठी जेएनपीटी रोडवर विशेष ...
नवी मुंबई : कोकण भवनमधील राज्य वस्तू व सेवा कर रायगड यांच्यावतीने ई वे बिल तपासणीसाठी जेएनपीटी रोडवर विशेष मोहीम राबविण्यात आली. दिवसभर ५९ वाहनांची तपासणी करून, एका वाहनावर जप्तीची कारवाई केली आहे.
जीएसटी विभागाच्या रायगड उपआयुक्त सुनीता थोरात व अलिबाग उपआयुक्त संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जेएनपीटी महामार्गावर ही मोहीम राबविण्यात आली. न्हावा शेवा बंदराकडे जाणाऱ्या व येणाºया वाहनांची कागदपत्रे तपासली. वाहनधारकांकडे ई वे बिल आहेत का याची तपासणी करण्यात आली. दिवसभर तब्बल ५९ वाहनांची तपासणी करण्यात आली. ५८ वाहनधारकांकडे बिले आढळून आली असून एका वाहनाकडे बिल आढळून आले नाही. ई वे बिल नसलेले वाहन जप्त करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. अचानक सुरु केलेल्या कारवाईमुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. या मोहिमेदरम्यान वाहतूकदार संघटनांच्या संस्थांचे समुपदेशन करण्यात आले. सर्व व्यापारी, वाहन चालक व वाहतूकदार यांनी ई वे बिल तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन उपआयुक्त सुनीता थोरात यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ई वे बिल संदर्भात नियमांचे वाहतूकदारांकडून पालन होते का याची पाहणी करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित केली होती. या अभियानाअंतर्गंत वाहतूकदार, व्यापारी यांनाही आवश्यक माहिती देण्यात आली. वाहनांची तपासणी करण्यात आली व ई वे बिल न आढळलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
- सुनीता थोरात, उपआयुक्त जीएसटी रायगड