लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मोठी गर्दी केली आहे. सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने माथेरान आणि नेरळ रेल्वेस्थानक परिसर पर्यटकांनी गजबजला होता. पार्किंगची जागा अपुरी पडत असल्याने घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.कर्जत तालुक्यासह माथेरान परिसरात मोठ्या प्रमाणात धबधबे असल्याने मुंबई, ठाणे, भिवंडी आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात पर्यटक वर्षासहलीसाठी येतात. दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे माथेरान हिरवेगार झाले आहे. डोंगर-कपाऱ्यांमधून धबधबे वाहत असल्याने पर्यटकांनी माथेरान आणि नेरळ परिसरातील धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.माथेरान-जुमापट्टी धबधबा घाटरस्त्यावरच असल्याने पर्यटकांनी गर्दी केल्याने जुमापट्टी स्थानकही गजबजले होते. अनेक जणांना सेल्फीचा मोह आवरत नव्हता. माथेरानमध्ये गेल्या २४ तासांत १४३.५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे, तर आजपर्यंतचा पाऊस ४१८ मिली मीटर झाला आहे.
माथेरान रस्त्यावर वाहनांच्या रांगा
By admin | Published: June 27, 2017 3:20 AM