नेरळच्या वाहतूककोंडीवर वाहनतळाचा उपाय; बाजारपेठेत मध्य रेल्वेकडून पे अॅण्ड पार्कची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 11:02 PM2020-02-06T23:02:43+5:302020-02-06T23:03:18+5:30
शहराची बाजारपेठेत खरेदीसाठी परिसरातील गावांमधून अनेकदा लोक आपल्या वाहनाने येत असतात.
नेरळ : शहराची बाजारपेठेत खरेदीसाठी परिसरातील गावांमधून अनेकदा लोक आपल्या वाहनाने येत असतात. मात्र, शहरात पार्किंगचा प्रश्न कायम असल्याने मिळेल तिथे वाहन लावून खरेदी होत असल्याने नेरळ बाजारपेठेत वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र होते. मात्र, नेरळ ग्रामपंचायत व नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने केलेल्या मागणीला प्रतिसाद देत नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्य रेल्वने पे अॅण्ड पार्कची सुविधा उपलब्ध केल्याने बाजारपेठेवरील अस्ताव्यस्त दुचाकी, चारचाकी पार्किं गचा प्रश्न निकाली निघाला आहे. यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त के ले आहे.
कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरळ शहराचे नागरीकीकरणही झपाट्याने होत आहे. मात्र, रस्त्यांची स्थिती अजूनही अरुंदच आहे. अशातच वाहनचालक दिसेल तिथे गाडी पार्क करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला होता. नेरळ बाजारपेठ, नेरळ बसस्थानक या परिसरात भररस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे, तसेच नेरळ रेल्वे स्टेशनबाहेर तर पूर्ण रस्ताच बंद असल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नेरळ हे आजूबाजूच्या सुमारे ५० गावांना जोडले गेले आहे. त्या सर्वांना नेरळची बाजारपेठ ही खरेदीसाठी सोयीस्कर पडते, त्यामुळे खरेदीसाठी अनेकदा नागरिक आपल्या वाहनाने नेरळमध्ये दाखल होत असतात.
मात्र, नेरळमध्ये वाहन पार्किंगला जागा नसल्याने आलेले नागरिक मिळेल तिथे आपले वाहन पार्क करून बाजारहाट करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण होते. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने टोइंग व्हॅनचा उतारा केला होता. मात्र, तो कामी आला नाही.
त्यामुळे मध्य रेल्वेकडे उपलब्ध जागा असल्याने नेरळ ग्रामपंचायत व नेरळ प्रवासी संघटनेची पार्किंगसाठी मागणी होती, तेव्हा नेरळकरांच्या मदतीला मध्य रेल्वे सकारात्मक झाली असून, नेरळ बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पे अॅण्ड पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुबलक जागा असल्याने दुचाकीसह चारचाकी गाड्याही पार्क होऊ शकतात. या सुविधेचे नेरळकरांकडून स्वागत होत आहे.
नेरळमध्ये कामानिमित्त येणे होत असते. मात्र, दुचाकी लावायला पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने जागा मिळेल तिथे गाडी लावायला लागत होती. त्यातही रस्त्यावर गाडी लावल्याने अनेकदा गाडीची तोडफोड होणे नित्याचे झाले होते. मात्र, बोलणार कोणाला? आता मध्ये रेल्वेकडून पार्किंगची सोय उपलब्ध झाल्याने उत्तम झाले आहे. या निर्णयाचे स्वागत आहे.
- सुमित क्षीरसागर, ग्रामस्थ, नेरळ