वाशीसह सीबीडीतून वाहनचोरांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:38 PM2019-08-03T22:38:11+5:302019-08-03T22:38:24+5:30
शहराबाहेरील टोळ्या सक्रिय; नागरिकांच्या दक्षतेमुळे प्रकार उघड
नवी मुंबई : वाहनचोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन वेगवेगळ्या टोळ्या पोलीसांच्या हाती लागल्या आहेत. दोन्ही टोळ्या शहराबाहेरील असून वाहनचोरीच्या उद्देशाने नवी मुंबईत यायचे. त्यांच्याकडून वाशी व सीबीडी परिसरात वाहनचोरी केली जात असतानाच त्यांना पकडण्यात आले.
शहरात घडत असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यात शहराबाहेरील टोळ्या सक्रिय असल्याचे दिसुन येत आहे. अशा दोन टोळ्या नवी मुंबई पोलीसांच्या हाती लागल्या आहेत. सिबीडी व वाशी येथून त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. सिबीडी सेक्टर ६ येथे राहणारया हरपिंदर सिंग यांची स्कॉर्पिओ कार बुधवारी रात्री सोसायटीबाहेर रस्त्यावर उभी होती.
रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा हरप्रित सिंग हा कामानिमित्ताने कार घेवून जाण्यासाठी त्याठिकाणी आला. यावेळी काहीजन कारच्या आतमध्ये बसलेले असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यामुळे त्याने मित्रांना त्याठिकाणी मदतीसाठी बोलवले. त्यांनी कारमधील व्यक्तींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकाला त्यांनी पाठलाग करुन पकडले. त्याला घेवून ते पुन्हा कारजवळ आले असता, कार मध्ये लपलेला इतर एकजन त्यांना आढळून आला. त्यानुसार या दोघांना पकडून पोलीसांच्या हाती देण्यात आले. चौकशीत अब्दुल शेख (४५) व रुस्तुम खान (२७) अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले. पकडलेले दोघेही गोवंडीचे राहणारे असून पळालेले त्यांचे साथीदार देखिल त्याच परिसरातील गुन्हेगार आहेत.
त्याच रात्री वाशी सेक्टर १४ मधून इनायतुल्ला रहेमतुल्ला शहा (३१) याला अटक करण्यात आली आहे. तो घाटकोपरचा राहणारा असून गॅरेजमध्ये कामाला आहे. इतर पाच साथीदारांसह तो सेक्टर १४ येथे कार चोरीसाठी आले होते. यावेळी तिथे रस्त्यावर उभ्या असलेल्या जयवंत यमगर यांची इनोव्हा कार चोरण्याचा प्रयत्न ते करत होते. त्याच वेळी गस्तीवरील पोलीसांची त्यांच्यावर नजर पडली असता, इतरांनी तिथून पळ काढला असता शहा हा पोलीसांच्या हाती लागला. या दोन्ही टोळीकडून नवी मुंबईतील वाहनचोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्यानुसार याप्रकरणी वाशी व सीबीडी पोलीस अधिक तपास करत आहेत.