नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गालगत वाशी येथील इनॉर्बिट मॉलच्या समोर असलेल्या पे अॅण्ड पार्किंगच्या आडून चक्क रस्त्यावरच वाहने पार्क केली जात आहेत, त्यामुळे महामार्गावरून पाम बीचकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी अवजड वाहनांनी हा संपूर्ण रस्ता अडविला जातो, त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.इनॉर्बिट मॉल आणि सायन-पनवेल महामार्गाच्या मध्यभागी महापालिकेने अवजड वाहनांसाठी वाहनतळ निर्माण केले आहे. या वाहनतळावर एपीएमसीच्या घाऊक मार्केटमध्ये येणारी अवजड वाहने पार्क केली जातात. या वाहनतळाच्या संचालनासाठी पे अॅण्ड पार्क धर्तीवर ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. वाहनतळाच्या समोरच पनवेलकडून मुंबईकडे जाताना पाम बीच मार्गाकडे वळसा घेण्यासाठी या वाहनतळाला लागूनच एक अरुंद रस्ता आहे. वाहनतळावर जाणारी वाहने याच रस्त्याचा अवलंब करतात; परंतु अनेकदा वाहनतळाची क्षमता पूर्ण झाल्यानंतर वाहने रस्त्यावर उभी केली जातात. अवजड वाहने रस्त्यावर पार्क केल्याने इतर वाहनांना मार्ग काढणे अवघड होऊन बसते.विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी हा प्रकार अधिक प्रमाणात दिसून येतो. मागील अनेक महिन्यांपासून या मार्गावरील पथदिवेही बंद आहेत, त्यामुळे महामार्गावरून पाम बीचकडे जाण्यासाठी वळसा घेताना वाहनधारकांचा संभ्रम होतो. कारण काळोखामुळे येथे रस्ता आहे की नाही,असा प्रश्न वाहनधारकांना पडतो. हा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरू असूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.धोकादायक पार्किंगया वाहनतळावर मोठे ट्रक, ट्रेलर्ससह केमिकल्सचे कंटेनर्सही पार्क केले जातात. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी या वाहनांचे चालक व वाहक येथेचे स्वयंपाक बनवितात. अनेकदा ट्रकच्या खालीच स्टोव्ह पेटवून जेवण बनविले जाते. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पे अॅण्ड पार्किंगमधील वाहने रस्त्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 1:53 AM