नेरुळ ते सीबीडीपर्यंत वाहनांच्या रांगा; अपघातामुळे पाच तास कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:48 PM2020-01-16T23:48:54+5:302020-01-16T23:49:28+5:30
सायन-पनवेल महामार्गावर उरण फाटा उड्डाणपुलावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी डांबरीकरणाच्या ऐवजी काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर नेरुळ उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी ७ वाजता ट्रेलर व डम्परचा अपघात झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तब्बल पाच तास वाहतूककोंडी झाली होती. नेरुळ ते सीबीडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला उड्डाणपुलावर पहाटे ट्रेलर बंद पडला. ७ वाजण्याच्या सुमारास बंद पडलेल्या ट्रेलरला डम्परने धडक दिली. डम्परमधील खडी रोडवर पसरली. यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस मुंबईकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलीस निरीक्षक किसन गायकवाड व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. उड्डाणपुलावरील एक लेन वगळता इतर वाहतुकीसाठी खुल्या ठेवल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने तत्काळ हटविण्यात आली. दुपारी १२ च्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने पुलावरील सर्व खडी डम्परमध्ये भरली. सकाळी मुंबईकडे जाणाºया वाहनांची संख्या जास्त असते. अपघातामुळे बसने नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी जाणाºया नागरिकांची गैरसोय झाली.
अपघातानंतर चार किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. नेरुळ एलपी, उरण फाटा व सीबीडीमध्ये रस्ता ओलांडून दुसºया दिशेने जाणाºया वाहनांनाही अडथळा निर्माण झाला होता. या तीनही ठिकाणी महामार्गावर पुण्याकडे जाणाºया दिशेला वाहतूककोंडी झाली झाल्याने पोलिसांना कसरत करावी लागली.
महामार्गावर नेरुळ पुलावर अपघात झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. पुलावरील खडी जेसीबीने उचलून वाहतूक सुरळीत करण्यात आली. - किसन गायकवाड, पोलीस निरीक्षक
दुरुस्तीच्या कामाचाही फटका
सायन-पनवेल महामार्गावर उरण फाटा उड्डाणपुलावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी डांबरीकरणाच्या ऐवजी काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामामुळेही सकाळी व सायंकाळी महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. रात्री ७ ते ९ दरम्यान उरण फाटा परिसरात चक्काजाम होत आहे.
अवजड वाहनचालकांकडून नियम धाब्यावर
महामार्गावर अवजड वाहनांचे चालक नियम धाब्यावर बसवत आहेत. रात्री वाशी, सानपाडा, नेरुळ, तुर्भे, सीबीडीमध्ये खासगी बसेस रोडवर उभ्या केल्या जात आहेत. यामुळेही महामार्गावरील वाहतूककोंडी होत आहे. ट्रेलर व ट्रकचालकही रोडवरच वाहने उभी केल्यामुळेही वाहतूककोंडी होत आहे.