नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भाजीपाला मार्केटमध्ये होणारा प्लास्टीकचा वापर थांबविण्यासाठी महानगरपालिकेने आता कापडी पिशवीसाठी वेंडींग मशीनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वाशीमधील भाजी मार्केटमध्ये प्रायोगीक तत्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.प्लास्टीकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्लास्टीकचा वापर करणारांवर कारवाई केली जात आहे. कापडी पिशवी वापरण्यासाठी जनजागृतीही केली जात आहे. भाजीपाला, फळ मार्केटमध्ये प्लास्टीक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे आता नागरिकांना मार्केटमध्ये सहजपणे कापडी पिशवी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाशी सेक्टर १७ मधील महाराजा भाजीपाला मार्केटमध्ये वेंडींग मशीन बसविण्यात आली आहे. १० रूपयांचे नाणे टाकल्यानंतर कापडी पिशवी मिळविता येणार आहे. पाच रुपयांची दोन नाणी टाकूनही पिशवी मिळविता येणार आहे. याशिवाय कोड स्कॅन करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. यामुळे मार्केटमधील प्लास्टीकचा वापर थांबविणे शक्य होणार आहे.
महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते मंगळवारी या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता संजय देसाई, बाबासाहेब राजळे, सागर मोरे, अजय संखे, संपत शेवाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधून प्लास्टीक ऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा. वेंडींग मशीनच्या पर्यायाचाही वापर करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.