पनवेल : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पनवेल विभागीय कार्यालयाबरोबरच भरारी पथक सुध्दा गेल्या २० वर्षांपासून एकाच ठिकाणी भाड्याच्या जागेत आहे. ही जागा अपुरी असून तेथे सुविधांची वानवा आहे. या व्यतिरिक्त भाडे करार पावती नसल्याने भाडे सुध्दा थकले आहे. इमारत मालकाने ही जागा खाली करण्याकरिता नोटीस धाडली आहे. त्यामुळे भरारी पथकाने जागेकरिता शोधाशोध सुरू केली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाची पनवेल येथे दोन कार्यालये आहेत. त्यामध्ये एक विभागीय आणि दुसरे भरारी पथकाचे कार्यालय आहे. विभागीय कार्यालयाकडे विविध बार परिमट रूम याची तपासणी करणे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे यासारखी जबाबदारी आहे. त्याचबरोबर भरारी पथकावर केवळ धाडी टाकण्याचा भार आहे. पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, पाली आणि पेण या तालुक्याकरिता पनवेल येथील भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. हातभट्टी निर्मिती करणाऱ्या भट्ट्या, बेकायदा दारू वाहतूक आणि विक्र ीवर हे पथक अचानक धाडी टाकून कारवाई करते. पंचरत्न हॉटेलच्या बाजूला असलेले हे कार्यालय १९९६ पासून आहे. भाडेतत्त्वावर ही जागा राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतली होती. मात्र त्यावेळी मालकाबरोबर भाडे करार पावती करण्यात आली नव्हती. अलीकडे भाड्याकरिता भाडे करार पावती शासनाने सक्तीची केली आहे. त्यामुळे भरारी पथकाच्या कार्यालयाचे गेल्या सात महिन्यांपासून भाडेच मिळालेले नाही. मालकाने भाड्याकरिता तगादा लावला आहे. त्याचबरोबर जागा खाली करण्याकरिता भरारी पथक कार्यालयाला नोटीस पाठवली आहे. वर्षभरात सर्व तालुक्यात अनेक धाडी टाकून बेकायदा दारू जप्त करण्यात येते. त्याचबरोबर दारूची अनधिकृत वाहतूक करणारी वाहने सुध्दा जप्त करण्यात येतात. त्याकरिता जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागेचा शोध सुरूच आहे. (वार्ताहर)
भरारी पथकाची वणवण
By admin | Published: January 21, 2016 2:42 AM