कामोठे वसाहतीत गटारावरील झाकणे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 05:14 AM2018-08-30T05:14:29+5:302018-08-30T05:15:48+5:30
सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष : अपघात होण्याची वाढली शक्यता
कळंबोली : कामोठे वसाहतीत पावसाळी गटारावरील झाकणे गायब झाल्याने दररोज लहान-मोठे अपघात घडतात. सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी काही बोलत नसल्याचा आरोप शेकापचे सचिन गायकवाड यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत या बाबत कार्यवाही करण्यात आली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कामोठे वसाहतीत नियमाप्रमाणे प्रत्येक रस्त्याच्या बाजूला आरसीसी गटारे बांधण्यात आली आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, या उद्देशाने बांधण्यात आलेल्या या गटारांची मान्सूनपूर्व साफसफाई केली जाते. त्याकरिता चेंबर काढण्यात आली आहेत आणि त्यावरील झाकणे मात्र गायब झाली आहेत. त्यामुळे पदपथावर चालणारे अनेक पादचारी रात्रीच्या वेळी त्या गटारांमध्ये पडतात. अनेकदा भटकी जनावरेही त्यामध्ये गेल्याची उदाहरणे आहेत. तीन दिवसांपूर्वी एक ज्येष्ठ नागरिकही अशा प्रकारे जखमी झाले. खांदेश्वर रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास ३० पेक्षा जास्त झाकणे गायब झाली आहेत.
कामोठे नोडमध्ये काही ठिकाणची झाकणे गायब झाल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे, त्यानुसार सेक्टरनिहाय पाहणी करून, ज्या-ज्या ठिकाणी झाकणे नाहीत, तिथे झाकणे टाकून पदपथ सुरक्षित करण्यात येतील.
- शिलरत्न जगताप,
सहायक कार्यकारी अभियंता,
सिडको, कामोठे