विचुंबे पूल वाहतुकीसाठी धोकादायक, दोन्ही बाजूचा रस्ता खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 03:29 AM2019-08-15T03:29:12+5:302019-08-15T03:29:26+5:30
दोन्ही बाजूने रस्ता खचल्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे जोडपूल धोकादायक झाला आहे. यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : दोन्ही बाजूने रस्ता खचल्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे जोडपूल धोकादायक झाला आहे. यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून विचुंबे ग्रामपंचायतीकडून खचलेला भाग वारंवार बुजवण्यात येत आहे. संबंधित यंत्रणेकडून या संदर्भात दुर्लक्ष होत आसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे. दरम्यान, संभाव्य अपघात टाळण्यासाठी या पुलाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी विचुंबे येथील रहिवाशांनी केली आहे.
नवीन पनवेलच्या बाजूला असलेल्या विचुंबे, उसर्ली, देवत, शिवकर, मोह या गावांमध्ये मोठमोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. या परिसरात एक ते दीड लाख लोकवस्ती झालेली आहे. या ठिकाणी राहणारे चाकरमानी, व्यावसायिक लोकल पकडण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकावर येतात. त्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे या जोडपुलावरील रहदारी आणखी वाढलेली आहे. तसेच गाव आणि परिसरात नवीन इमारतींची मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे दिवसभर अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. या सर्वांचा भार या पुलावर पडताना दिसत आहे. हा पूल २००२ मध्ये बांधण्यात आला आहे. त्यामुळे तो आकाराने छोटा व अरुंद आहे. त्यावरून वाहनांची रहदारी वाढल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने ये-जा करीत असल्याने नवीन पनवेल आणि विचुंबेला जोडणाºया या पुलावर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे पुलाच्या पिलरला तडे गेले आहेत. काही ठिकाणी सळई उघड्या पडलेल्या आहेत, तसेच दोन्ही बाजूचे रस्ते काही ठिकाणी खचल्याचे दिसून येते.
विचुंबे ग्रामपंचायतीच्या वतीने या पुलाची नियमित डागडुजी केली जाते. मात्र, त्यानंतरही हा रस्ता खचत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रस्ता खचल्याने विचुंबे ग्रामपंचायतीने येथील अवजड वाहतूक बंद केली आहे, तसेच काही सूचनाफलक लावण्यात आले आहेत. याशिवाय तात्पुरते हाइट गेज लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
नवीन पनवेल-विचुंबे पुलाकरिता विचुंबे ग्रामपंचायतीकडून गेली तीन वर्षे पाठपुरावा सुरू आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला रस्ता खचला आहे. तो आम्ही वारंवार दुरु स्त केला आहे. लवकरच या पुलाची पुनर्बांधणी करावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- विनायक भोईर,
सहायक माहिती अधिकारी, ग्रामपंचायत, विचुंबे
नवीन पुलाला मंजुरी
विचुंबे एमएमआरडीएच्या अखत्यारित येत आहे. नवीन पनवेल-विचुंबे जोडपुलाची दुरवस्था झाल्याने याबाबत शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी विधान परिषदेत आवाज उठवला होता. तसेच स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनीसुद्धा याविषयी पाठपुरावा केला होता. काही महिन्यांपूर्वी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी करून याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार एमएमआरडीएकडून तीन कोटी रु पये खर्चाच्या नवीन पुलाला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध होऊन कामाला सुरु वात होणे अपेक्षित आहे.