- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली सिडकोकडून कामोठे नोडचा विकास करण्यात येत असला तरी या ठिकाणी नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांबरोबरच परिसराचे विद्रूपीकरण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रस्ता, नाका, चौक, उड्डाणपुलावर इतकेच नव्हे तर सिग्नलवरही मोठमोठे होर्डिंग्ज, बॅनर्स बेकायदेशीरपणे लावण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यात राजकीय पक्षांच्या बॅनर्सचा भरणा अधिक आहे. पनवेल परिसरात नेहमीच राजकीय चढाओढ सुरू असते. पनवेल महानगरपालिका व्हावी, याकरिता या वसाहतीतून चळवळ, सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली होती. या नोडमधील लोकवस्तीबरोबरच मतदारांची संख्याही वाढत आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी राजकीय पक्ष नेहमीच विविध युक्त्या लढवत असून बॅनरबाजीवर भर दिला जातो. लहान-मोठ्यांच्या वाढदिवसानिमित्त चौकाचौकात, नाक्यानाक्यावर शुभेच्छांचे बॅनर्स लावले जातात. आपल्या नेत्याला खूश करण्याकरिता बॅनर्स लावले जातात. शेकडो फोटो त्यात छापून ते बॅनर चौकात किंवा महत्त्वाच्या ठिकाणी लावतात. सण, उत्सवाच्या काळात तर या वसाहतीत फक्त बॅनर्स लावण्यात येतात. या स्पर्धेत सर्वच राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. काही नेते आणि पक्षांनी तर आपली जागा जणू काही आरक्षित करून ठेवली आहे. ठरावीक ठिकाणी त्याच पक्षाचा किंवा नेत्याचा फलक लावण्यात येतो. कित्येकदा बॅनर लावण्यावरून तसेच फोटो न टाकण्यावरून वाद होऊन पोलीस ठाण्यापर्यंत तक्रारी गेल्याची प्रकरणे घडली आहेत. बॅनर फाडणे, काढून टाकणे यामुळे कित्येकदा कायदा आणि व्यवस्था धोक्यात येते. असे असले तरी बॅनरबाजी मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेले म्हणजे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे विस्टा कॉर्नर चौक बेकायदेशीर फलकाने हरवून गेला आहे. आवास सहकारी गृहनिर्माण संस्थेसमोर खाऊ गल्ली चौकात बॅनर्स, होर्डिंग्ज दिसत आहेत. गोकूळ डेअरीसमोर सिल्व्हर स्टार इमारत आहे. त्यासमोर जो पदपथ आहे तो व्यावसायिकांनी जाहिरात करणाऱ्या फलकाने अडवला आहे.दुभाजकावर अतिक्रमणकामोठे वसाहतीतील काही रस्ते प्रशस्त आहेत. त्यावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. विशेषकरून महामार्ग ते मानसरोवर रेल्वे स्थानक हा रस्ता मोठा आहे. या दुभाजकावर सिडकोने काही झाडे लावली आहेत. त्याची जोपासना सुध्दा केली जाते. मात्र त्या दुभाजकावर बेकायदेशीर बॅनर्स, फलक लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर झाडांना खिळे ठोकून त्यावर बॅनर लावण्यात येतात. याबाबत सिडकोकडून कोणतीही कारवाई होत नाही.तेच नेते तेच चेहरे असलेले बॅनर पाहून आम्ही कंटाळलो आहोत. वर्ष-दोन वर्षे एकच बॅनर अनेक ठिकाणी तसेच आहेत. त्यामुळे ना काही दिसत. त्याचबरोबर सगळे विद्रूपीकरण झाले आहे. जनाची नाही तर मनाची लाज राखून राजकीय नेत्यांनीही बॅनरबाजी थांबवावी.- अनिता गावडे, रहिवासी, कामोठेकामोठे वसाहतीत बॅनर सोडून काहीच दिसत नाही. जिकडे तिकडे फक्त फलक, होर्डिंग्ज दिसतात. सण, उत्सव, मिळेल त्या संधीचा राजकीय मंडळी फायदा उठवतात. सर्वसामान्यांना त्याचा नेमका काय फायदा, असा प्रश्न पडतो. याबाबत सिडकोने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.- कैलास नवले, रहिवासीफेरीवाल्यांनी तर रस्ते आणि पदपथ काबीज केले आहेत. त्याचबरोबर दुकानदारांनी आपली दुकानाची जाहिरात करणारे फलक पदपथावर लावले आहेत. त्यामुळे चालण्याकरिता जागा उरलेले नाही. रस्त्यावर चालताना भरधाव वेगाने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची भीती वाटते. याबाबत सिडकोने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.- सुनीता सरवदे, रहिवासी, कामोठेबेकायदेशीर फलकाविरोधात आम्ही मोहीम राबवत आहोत. काही वसाहतींमधील फलक काढण्यात आले आहेत. त्या झोन अधिकाऱ्यांना सूचना सुध्दा करण्यात आल्या आहेत. लवकरच याविरोधात मोहीम हाती घेणार आहे. राजकीय पक्ष आणि व्यावसायिकांनी बॅनर व होर्डिंग्ज लावून विद्रूपीकरण करू नये. - एस. जे. गोसावी, बांधकाम नियंत्रक, सिडको
बेकायदेशीर बॅनर्समुळे कामोठे विद्रूप
By admin | Published: March 29, 2016 3:09 AM