धोकादायक इमारतीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 03:41 AM2017-07-22T03:41:44+5:302017-07-22T03:41:44+5:30

सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इमारतींच्या स्लॅबचा भाग कोसळून रोज अपघात होत असून रहिवासी जीव मुठीत घेवून वास्तव्य करत

The victim of the dangerous building | धोकादायक इमारतीचा बळी

धोकादायक इमारतीचा बळी

Next

- नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इमारतींच्या स्लॅबचा भाग कोसळून रोज अपघात होत असून रहिवासी जीव मुठीत घेवून वास्तव्य करत आहेत. नेरूळ सेक्टर ६ मधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये छताचा भाग कोसळून बनुबाई लोंढे (वय ९०) या महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होवून पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लावणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एव्हरग्रीन सोसायटीमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या आशा साबळे यांच्या घरामध्ये १६ जुलैला पहाटे सहा वाजता स्लॅबचा काही भाग कोसळला. छताचे प्लास्टर आशा यांच्या आई बनुबाई लोंढे यांच्या छातीवर कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात नेण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईला सायनमधील लोकमान्य टिळक रूग्णालयामध्ये हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसामध्ये एव्हरग्रीन सोसायटीमध्ये चार ठिकाणी छताचे प्लास्टर कोसळले आहे. या शेजारी असलेल्या दत्तकृपा सोसायटीही धोकादायक घोषित करण्यात आली आहे. दत्तकृपाची स्थिती एव्हरग्रीनपेक्षा गंभीर असून तेथे छताच्या प्लास्टरबरोबर जीनेही निखळू लागले आहेत. दत्तकृपा यापूर्वीच धोकादायक घोषित करण्यात आली आहे.परंतु अद्याप तिच्या पुनर्बांधणीला परवानगी देण्यात आलेली नाही. नेरूळ सेक्टर २४ मधील स्वागत गृहनिर्माण सोसायटीमध्येही दोन दिवसांपूर्वी स्लॅबचा काही भाग कोसळला असून वाशीमधील एकता सोसायटीमध्ये स्लॅबचा भाग कोसळून एक जखमी झाला आहे.
महानगरपालिकेने शहरातील ३१५ बांधकामे धोकादायक घोषित केली आहेत. धोकादायक बांधकामांमध्ये सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारतींचाही समावेश आहे. सीवूड, नेरूळ, वाशी, तुर्भे परिसरामधील जुन्या इमारती जर्जर झाल्या असून इमारतींच्या स्लॅबचा भाग वारंवार कोसळू लागला आहे. स्लॅब कोसळून आतापर्यंत अनेकजण जखमी झाले आहेत. अनेकांनी स्वत:ची हक्काची घरे सोडून दुसरीकडे भाडेतत्त्वावर घरे घेवून राहण्यास सुरवात केली आहे. ज्यांना पर्याय नाही ते मोडकळीस आलेल्या इमारतीमध्येच जीव मुठीत घेवून वास्तव्य करत आहेत. प्रत्येक सूर्योदयाबरोबर या रहिवाशांना पुनर्जन्म झाल्याचा अनुभव येवू लागला आहे. पावसाळ्यात कधी कोणती इमारत कोसळेल व प्राणाला मुकावे लागेल याची खात्री राहिलेली नाही. जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वीच अडीच एफएसआय मंजूर केला आहे. परंतु सिडको व महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे अद्याप एकाही इमारतीच्या बांधकामाला परवानगी मिळालेली नाही. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत.

पालिकेला किती बळी हवे आहेत?
महापालिका प्रत्येक वर्षी धोकादायक इमारतींची नावे जाहीर करत असते. रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी नोटीस दिली जात असून अनेकांची नळजोडणीही खंडित केली आहे. घरे खाली करण्यास भाग पाडणारी पालिका पुनर्बांधणीसाठी मात्र परवानगी देत नसून अजून किती बळी गेल्यानंतरही प्रशासन जागे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रहिवासी भयभीत
धोकादायक इमारतीमधील रहिवासी जीव मुठीत घेवून जगत आहेत. परंतु आतापर्यंत कधीही कोणाचा मृत्यू झाला नव्हता. एव्हरग्रीन सोसायटीमधील घटनेनंतर धोकादायक इमारतीमधील रहिवासी भयभीत झाले आहेत. पाऊस सुरू झाला की इमारत कोसळण्याच्या भीतीने रहिवाशांच्या पोटात गोळा येवू लागला आहे.

एव्हरग्रीन सोसायटीमध्ये आतापर्यंत चार ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे स्लॅब कोसळून बनुबाई लोंढे जखमी झाल्या होत्या. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. शासन व प्रशासनाने जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीविषयी ठोस भूमिका घ्यावी.
- महादेव पवार,
सामाजिक कार्यकर्ते, नेरूळ

Web Title: The victim of the dangerous building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.