नवी मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एनआरआय पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. चौकशीत त्याने १७ वर्षीय कंपाउंडरसह अनेक महिला रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अत्याचार केल्याचे उघड झाले. बेलापूर येथील दिवाळे गावात डॉ. संजय लाड (५५) याचा सुमारे २० वर्षांपासूनचा दवाखाना आहे. त्याच्याकडे काम करणारऱ्या १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलगी मुंबईची राहणारी असून बारावीची परीक्षा दिलेली आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने सुट्टीच्या दिवसात नोकरी शोधण्यासाठी ती जुईनगर येथील आत्याकडे आली होती. दिवाळे येथील डॉ. लाडच्या दवाखान्यात नोकरी मिळाल्यानंतर ती पुन्हा मुंबईला राहायला गेली. त्या ठिकाणावरून ती दररोज दिवाळेला ये-जा करायची. मात्र, १ एप्रिलला ती दवाखान्यात गेल्यानंतर परत घरी न आल्याने घरच्यांनी डॉ. लाडकडे चौकशी केली होती. या वेळी ती दुपारीच निघून गेल्याचे त्याने सांगितले, यामुळे तिच्या नातेवाइकांनी एनआरआय पोलीसठाण्यात तिच्या अपहरणाची तक्रार केली होती. त्याच रात्री उशिरा पीडित मुलीने घरी येऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.दवाखान्यात कोणीच नसल्याची संधी साधून लाड याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, यामुळे तणावामध्ये ती मडगावला जाणाºया एक्स्प्रेसमध्ये बसली होती. या वेळी रेल्वेत भेटलेल्या एका महिलेने तिला धीर देत पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला, यानुसार पीडित मुलीने घरी संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर लाडविरोधात एनआरआय पोलीसठाण्यात तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी बलात्कारासह पॉक्सोच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून लाडला अटक केली. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुुनावली आहे.
पोलिसांच्या चौकशीत डॉ. लाड याने मागील काही वर्षांत अनेक महिला रुग्ण व दवाखान्यात नोकरी करणाºया मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. दवाखान्यात फक्त मुलींनाच नोकरीवर ठेवून संधी साधून त्यांच्यावर अतिप्रसंग करायचा. त्याशिवाय उपचारासाठी येणाºया गरीब कुटुंबातील महिला व मुलींनाही मोफत उपचाराचे अथवा पैशांचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करायचा. अखेर सदर तक्रारदार मुलीच्या तक्रारीवरून संपूर्ण प्रकार उघडकीस आला.