खड्ड्याने घेतला प्रवाशाचा बळी; सायन-पनवेल महामार्गावरील उरण फाट्याजवळ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:17 AM2018-07-06T03:17:56+5:302018-07-06T03:18:11+5:30
सायन-पनवेल महामार्गाचे काम निकृष्ट झाले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उरण-फाटा येथे खड्ड्यामुळे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
नवी मुंबई, पनवेल : सायन-पनवेल महामार्गाचे काम निकृष्ट झाले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उरण-फाटा येथे खड्ड्यामुळे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातून मुंबईमध्ये येण्यासाठी सायन-पनवेल महामार्ग हाच महत्त्वाचा रोड आहे. या रोडवरून रोज जवळपास तीन लाख वाहनांची ये-जा सुरू असते. महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने महामार्गाचे रुंदीकरण केले; परंतु त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी वाढले आहेत. गतवर्षी उरण फाटा येथे अपघातांची मालिका सुरू झाली होती. सीबीडीमधील एका प्रवाशाचा मृत्यूही झाला होता. यावर्षी पुन्हा उरण फाटा परिसरामध्ये खड्ड्यांमुळे अपघात होऊ लागले आहेत. तळोजा येथे राहणारे इब्राहिम मोहम्मद खुर्शीद (५८) यांच्या दुचाकीला अपघात झाला. अचानक समोर आलेल्या खड्ड्यामध्ये चाक गेल्याने त्यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर कोसळले. मागून आलेली वाहने त्यांच्या शरीरावरून गेल्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
खड्ड्यांमुळे खुर्शीद यांचे निधन झाले असून, या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उरण फाटा येथे खड्ड्यांमुळे गुरुवारी प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली होती. दिवसभर चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. तुर्भे उड्डाणपुलावरही चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती.
खारघर ते कळंबोली दरम्यानही अवस्था बिकट आहे. कळंबोली पुरुषार्थ पेट्रोलपंपाजवळ उड्डाणपुलाखाली महामार्गाची चाळण झाली आहे.
खड्ड्यांविषयी मंत्र्यांनाही पत्र
महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. रोज वाहतूककोंडी होऊ लागली आहे. तुर्भे उड्डाणपूल, नेरुळ, उरणफाटा, कळंबोली परिसरामध्ये वारंवार चक्काजाम होत आहे, यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला आहे. या विषयी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांच्याकडेही नागरिकांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.
दुरवस्थेचे विधानसभेत पडसाद
सायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेचे गुरुवारी विधानसभेत पडसाद उमटले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी हा प्रश्न उपस्थित करून महामार्गाच्या निकृष्ट कामाला जबाबदार असलेल्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल कारावेत. तसेच या महामार्गाचे नव्याने काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर संबंधित कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. तसेच महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
येशी ते खुर्शीद अपघाताची मालिका
सायन-पनवेल महामार्गावर गतवर्षी पावसाळ्यामध्ये उरण फाटा येथे अपघात होऊन नेरुळ येथील चंद्रकांत येशी यांचा मृत्यू झाला होता. सीबीडीमध्ये राहणारे येशी कामानिमित्त नेरुळमध्ये जात असताना हा अपघात झाला. याच ठिकाणी यावर्षी खड्ड्यांमुळे अपघात होऊन इब्राहिम मोहम्मद खुर्शीद यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
महामार्गावर ज्या-ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, ते बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, काही दिवस पाऊस पडत असल्याने अडचणी येत आहेत. पाऊस उघडल्यानंतर सर्व कामे पूर्ण करण्यात येतील.
- एस. व्ही. अलगुर,
उपअभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग