पनवेलमध्ये विकासाच्या नावाखाली घेतला जातोय झाडांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 02:00 AM2019-06-25T02:00:43+5:302019-06-25T02:01:20+5:30
नवी मुंबईनंतर आता पनवेल परिसरामध्येही दुकानांच्या समोरील वृक्षांवर विषप्रयोग करण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
- अरुणकुमार मेहेत्रे
कळंबोली - नवी मुंबईनंतर आता पनवेल परिसरामध्येही दुकानांच्या समोरील वृक्षांवर विषप्रयोग करण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. नेरे-माथेरान रोडवरील अनेक झाडे विषप्रयोगाने मारली गेली आहेत. त्याचबरोबर कळंबोलीत सुद्धा हा प्रकार समोर आला आहे. शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी करोडो रु पये खर्च करत असले तरी पनवेल परिसरात झाडे अशा प्रकारे मारली जात आहेत. याबाबत महापालिका व सिडकोकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
नवीन पनवेल येथील एचडीएफसी ते आदई सर्कल या दरम्यान सिडकोने सुरु वातीला झाडे लावून वनराई केली. या रोडवर बँका, शोरु म, बांधकाम व्यावसायीकांची कार्यालये असल्याने वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिक व वाहनांची सातत्याने वर्दळ असते. उन्हाळ्यात हीच झाडे सावली देण्याचे काम करत असत. अचानक येथील झाडे सुकू लागली. झाडांची पानगळ झाली. अशी शेकडो झाडे मरणावस्थेत आहेत. या झाडांवर विषप्रयोग होत असल्याने ती मृत अवस्थेत आहेत. सद्यस्थितीत मोठमोठी दुकाने, शोरु म, जाहिरात फलक दिसत नाहीत म्हणून हिरवळ असलेल्या झाडांची विष देवून कत्तल केली जाते. कळंबोलीतील होर्डिंग उभारण्यासाठी झाडांना विष देवून मारण्यात आले.
याबाबत पनवेल परिसरातील सामाजिक संस्थांनी आवाज उठवत चौकशीची मागणी केली. याबाबत पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत आवाज उठवला. मात्र रविवारी होर्डिंगवर जाहिरातीचा फलक लावण्यात आला. यामुळे सभागृह नेते, स्थायी समितीचे माजी सभापती व भाजपचे कळंबोली शहर
उपाध्यक्ष तोंडघशी पडले. मनसेनेसुद्धा निवेदन दिले, सह्यांची मोहीम घेतली. मात्र जाहिरातीचा फलक उभा राहिला आहे.
पर्यावरणाच्या संतुलनावरही परिणाम
विकासासाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा परिणाम पर्यावरणावरही होऊ लागला आहे. अशीच स्थिती राहिली तर नवी मुंबई, पनवेल परिसरातील प्रदूषण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महामार्ग रुंदीकरण, उड्डाणपूल, रस्ते सिमेंटीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. यासाठीही मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली आहेत.
या बदल्यात तिप्पट झाडे लावणे बंधनकारक असताना, अद्याप एकही झाड लावण्यात आले नाही. या संदर्भात वनविभाग अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता हे आमच्या अखत्यारीत येत नाही. महापालिका व सिडकोनेच दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळाली नाही.
झाडांवर असा विषप्रयोग केला जातो
झाडांची साल काढली जाते. तसेच काही झाडांच्या खोडावर खिळे ठोकून दोन तीन इंच छिद्रे करण्यात येते. त्यात इंजेक्शनद्वारे मारक रसायन आत सोडले जाते. यात सल्फ्युरीक व हायड्रोक्लोरीक अॅसिडचाही वापर केला जातो. त्यामुळे हळूहळू झाडे मृत अवस्थेत जातात. झाडांची पानगळ होते.
महापालिका व सिडकोची अनास्था
इतक्या मोठ्या प्रमाणात रसायनाचा वापर करून झाडे मारली जातात. पण याच्या मुळाशी जावून सिडको आणि महापालिका शोध घेत नाही. संबंधितांवर गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. यासाठी कोणी पुढे येत नसल्याची खंत अॅड. श्रीनिवास क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
नवी मुंबईमध्येही घडल्या होत्या घटना
यापूर्वी नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्येही हा विषय चर्चेत आला होता. वाशी सेक्टर १७, वाशी रेल्वे स्टेशनसमोरील व्यावसायिक इमारतींचा परिसर, सानपाडामधील एक शाळा व इतर दुकानांच्या समोरील वृक्ष अचानक सुकले होते.