नवी मुंबई : शहराचा क्वीन नेकलेस समजला जाणारा पामबीच मार्ग मच्छीमारांसाठी मृत्यूचा मार्ग ठरत आहे. मार्गावर भुयारी मार्ग नसल्याने रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात आजपर्यंत १३ मच्छीमारांचे बळी गेले आहेत. अपघातांची ही मालिका थांबवण्यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे.शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कमी वेळात जाता यावे यासाठी सिडकोने खाडीलगत पामबीच मार्ग बनवला. सध्या हा मार्ग पालिकेच्या ताब्यात आहे. मार्गालगत सानपाडा, सारसोळे, करावे व इतर काही प्रमुख गावे आहेत. तेथील रहिवासी मासेमारी करतात. त्याकरिता खाडीमध्ये जाण्यासाठी त्यांना रोज पामबीच मार्ग ओलांडावा लागतो. परंतु सिडकोने कुठेच भुयारी मार्ग अथवा पादचारी पूल बनवलेला नाही. त्यामुळे अनेक मच्छीमारांचे भरधाव वाहनांची ठोकर लागून त्यांचे अपघात होतात. आजवर १३ मच्छीमारांचे प्राण गेले आहेत. अपघात रोखण्यासाठी सिडको व महापालिकेने वेळीच योग्य ती उपाययोजना करावी, असे पत्रही प्रशासन व पोलिसांना देण्यात आलेले आहे. मंगळवार, १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय आंदोलन होणार असल्याचे नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पामबीचने घेतले १३ मच्छीमारांचे बळी
By admin | Published: July 13, 2015 2:52 AM