वकिलाच्या पतीवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:23 AM2017-11-13T01:23:09+5:302017-11-13T01:24:23+5:30
स्वप्निल सोनवणे हत्या प्रकरणातील महिला वकिलाचे पती अमित कटारनवरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. जुईनगर येथील कार्यालयात ते एकटे बसलेले असताना, चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्वप्निल सोनवणे हत्या प्रकरणातील महिला वकिलाचे पती अमित कटारनवरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. जुईनगर येथील कार्यालयात ते एकटे बसलेले असताना, चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नेरूळच्या डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी दुपारी जुईनगर येथील कटारनवरे यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला.
दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयात एकटेच असताना, चार ते पाच जण त्यांच्या कार्यालयात आले. त्यांनी सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने कटारनवरे यांच्या डोक्यात, तसेच पोटावर व पायावर वार करून पळ काढला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना नेरूळच्या डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उ पचार सुरू आहेत. मात्र, त्यांनी पोलिसांना कार्यालयाची चावी न दिल्याने, तसेच जबानीसाठी सहकार्य न केल्याने या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या प्रकरणी परिसरा तील सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले असून, अधिक तपास सुरू असल्याचे परिमंडळ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले. कटारनवरे यांच्यावर पाच महिन्यांपूर्वीही जुईनगर परिसरात जमावाने हल्ला केला होता. लाकडी दांडक्यांसह दगडाने त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती.