डोंबिवली : ‘महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन’ने घेतलेल्या ४४ व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट व ज्युनिअर ज्युदो स्पर्धांत ठाणे जिल्हा संघाने चमकदार कामगिरी केली. यामुळे या संघातील डोंबिवलीच्या ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’च्या आठ ज्युदोपटूंची राष्ट्रीयस्तरावर निवड झाली आहे. नाशिक येथील त्र्यंबक येथे १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान या स्पर्धा पार पडल्या. त्याचे नियोजन नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनने केले होते. महाराष्ट्राच्या २० जिल्ह्यांतील ४०० ज्युदोपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. ‘व्हिक्टरी’च्या पूजा गुप्ता, हिमानी गावकर, मानसी मोरे यांनी आपापल्या वयोगटांत व वजनगटांत सुवर्णपदक मिळवले. तर, मानस भोळे यांनी कांस्यपदक पटकावले. मानसी मोरे हिचा कॅडेट गटातील वजनगट फक्त राज्यस्तरापर्यंतच मर्यादित होता. ज्युनिअर गटातील पूजा गुप्ता व गावकर यांची निवड उत्तर प्रदेशमधील सफाय येथे २४ ते २८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र ‘ब’ संघात झाली आहे. मात्र प्रियंका गुप्ता, कृतिका सावंत, नील मॅथ्यू व निखिल सावंत यांना या स्पर्धेत सहभाग प्रमाणपत्रावर समाधान मानावे लागले. या सर्व ज्युदोपटूंना ज्युदो कोच पूर्वा मॅथ्यू, आशुतोष लोकरे व प्रवेंद्र सिंग यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
डोंबिवलीच्या ज्युदोपटूंची ‘व्हिक्टरी’
By admin | Published: November 18, 2016 2:44 AM