पनवेल : कोकण शिक्षक मतदासंघात निवडून आलेले आमदार बाळाराम पाटील यांच्या विजयानिमित्त पनवेलमध्ये गुरुवारी शेतकरी पक्षाच्या वतीने विजयी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी शेकाप व मित्रपक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेकापचे चिटणीस जयंत पाटील यांची या मिरवणुकीत विशेष उपस्थिती होती.पनवेल विधानसभा निवडणुकीत याआधी दोन वेळा बाळाराम पाटील हे पराभूत झाले होते. मात्र, तिसऱ्यांदा कोकण शिक्षक मतदार संघातून ते विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर फुगड्या घातल्या. या विजयामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढल्याचे दिसून येत आहे. पनवेल येथील शिवाजी पुतळ्याजवळून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरु वात झाली. पंचरत्न हॉटेल समोरील संत जगनाडे चौक मार्गे शनिमंदिरावरून,मस्जिद नाका, महापालिका कार्यालय, पुन्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी येऊन मिरवणुकीची सांगता झाली. या ठिकाणी अन्य वक्त्यांसोबत आमदार बाळाराम पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘या विजयामुळे शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘बूस्टर चा डोस’ मिळाला आहे. जातीयवादी आणि प्रतिगामी शक्तींना धूळ चारताना, निवडणुकीसाठी प्रचार करणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले. हा विजयाचा वारू पनवेल शहर महापालिकेच्या विजयापर्यंत पोहोचला पाहिजे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. मिरवणुकीत शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार विवेक पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस डॉ. भक्तीकुमार दवे, कामगार नेते श्याम म्हात्रे आदींसह हजारो संंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतकरी कामगार पक्षाची पनवेलमध्ये विजयी मिरवणूक
By admin | Published: February 10, 2017 4:23 AM