नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक गतवर्षीच्या तुलनेमध्ये कमी झाली आहे. यामुळे बाजारभाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. माल पुरेसा नसल्यामुळे यावर्षी गुढीपाडव्यालाही आंबा स्वस्त मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यंदा हापूसची आवक लवकर सुरू झाल्याने हंगाम चांगला होईल असे मत व्यक्त केले जात होते. परंतु थंडीचा कालावधी वाढल्यामुळे व रोगाची लागण झाल्याने पिकावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडूमध्येही पीक कमी आहे. गतवर्षी मार्चअखेरीस मार्केटमध्ये ५० हजार पेट्यांची आवक होत होती. परंतु सद्यस्थितीमध्ये सरासरी २० हजार पेट्यांची आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूसची पेटी १५०० ते ४ हजार रुपये दराने विकली जात आहे.प्रत्येक वर्षी गुढीपाडव्यापासून आंब्याचे दर आवाक्यामध्ये येत असतात. परंतु यावर्षी पाडव्याला आंबा महागच असणार आहे.मुंबईमध्ये १५ एप्रिलनंतरच आंब्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आंबा व्यापारी संजय पानसरे यांनी दिली. निर्यातदार मोहन डोंगरे यांनी सांगितले की, सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये काही प्रमाणात माल निर्यात होऊ लागला आहे. परंतु आवक समाधानकारक नसल्याने निर्यातीलाही अद्याप गती आलेली नाही. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच खरा हंगाम सुरू होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
VIDEO : गुढीपाडव्यालाही आंबा स्वस्त नाही; १५ एप्रिलनंतरच हापूस सामान्यांच्या आवाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 2:54 AM