नवी मुंबई : सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली. या घटनेनंतर सिडकोतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोचा दक्षता विभाग आता अधिक सतर्क झाला आहे. त्यानुसार भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. अशा प्रकरणांचा जलद निपटारा करण्याच्या दृष्टीने विशेष कार्यवाही केली जाणार असल्याचे समजते.विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभारणाºया सिडको महामंडळाची भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. सिडकोतील कथित भ्रष्टाचाराचे विधिमंडळाच्या अधिवेशनातही अनेकदा पडसाद उमटले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रकल्प व दर्जेदार सोयी-सुविधांमुळे विविध स्तरातून कौतुकाची थाप मिळविणाºया सिडकोला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले. या सर्व प्रकाराचा गांभीर्याने विचार करून सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सिडकोत स्वतंत्र दक्षता विभाग सुरू केला. राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या विभागाच्या प्रमुखपदावर पोलीस महासंचालक पदाच्या अधिकाºयाची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार प्रज्ञा सरवदे यांची सिडकोच्या पहिल्या दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. सरवदे यांना आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला आळा घालण्यात काही प्रमाणात यश मिळाले. सुरुवातीच्या काळात सिडकोतील कर्मचारी संघटनांनी त्यांच्या तपास प्रक्रियेवर आक्षेप घेतला. सरवदे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागेवर विनय कारगांवकर यांची मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचीही बदली झाली. आता या पदावर दक्षता अधिकारी म्हणून निसार तांबोळी हे रुजू झाले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील दोन अधिकाऱ्यांना एका विकासकाकडून लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. कडक शिस्ती व भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ म्हणून पोलीस दलात ओळख असलेले तांबोळी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याचे समजते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी त्यांनी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दरम्यान, तांबोळी हे सध्या प्रशिक्षणासाठी परदेशात गेले आहेत. दौºयाहून परतल्यानंतर सिडकोतील भ्रष्टाचाराला चाप लावण्याच्या दृष्टीने ते सकारात्मक पावले उचलतील, अशी चर्चा सध्या सिडकोत सुरू आहे.
दक्षता विभाग होणार अधिक सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:04 AM