संविधान हातात घेऊन झोपडपट्टीवासीयांसाठी लढा देणार, विजय चौगुले यांचा निर्धार
By नामदेव मोरे | Published: July 3, 2024 05:11 PM2024-07-03T17:11:01+5:302024-07-03T17:13:05+5:30
महायुती सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती सांगण्यासाठी सानपाडा येथील वडार भवनमध्ये पत्रकार परिषद आयाेजीत केली होती.
नवी मुंबई : एसआरए ला काही व्यक्तींनी विरोध केल्यामुळे झोपडपट्टीचे सर्वेक्षण थांबले आहे. पण आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून सर्वेक्षण व एसआरए चा प्रश्न मार्गी लावणार. वेळ पडलीच तर झोपडपट्टीवासीयांसाठी संविधान हातात घेऊन लढा देणार असून आगामी निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधील दोन्ही विधानसभेची मागणी आमचा प्रश्न करेल असा निर्धार शिंदे सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांनी व्यक्त केला आहे.
महायुती सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती सांगण्यासाठी सानपाडा येथील वडार भवनमध्ये पत्रकार परिषद आयाेजीत केली होती. यावेळी उपनेते विजय नाहटा यांनी शासनाच्या माध्यमातून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम शासनाने केले आहे. नवी मुंबईमध्ये ज्वेलरी पार्क व इतर प्रकल्प येत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिंदे सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांनीही नवी मुंबईमध्ये पक्षाची ताकद वाढत आहे. येणाऱ्या विधान सभेसाठी आम्ही नवी मुंबईमधील दोन्ही मतदार संघाची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षण सुरू केले होते. परंतु काही व्यक्तींनी विरोध केल्यामुळे सर्वेक्षण थांबले आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. ज्यांच्या जमीनीवर झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. त्याच प्राधिकरणाच्या माध्यमातून एसआरए योजना राबविण्याचेही प्रस्तावीत आहे. याविषयीचे योग्य ते निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. जर कोणी एसआरए ला विरोध करून सामान्य नागरिकांच्या हिताच्या आड येणार असेल तर आम्ही संविधान हातात घेवून झोपडपट्टीवासीयांसाठी लढा देणार आहोत. लाव रे तो व्हिडीओची वेळ आमच्यावर कोणी येवून देवू नये असा इशाराही त्यांनी राजकीय विरोधकांना दिला. यावेळी दिलीप घोडेकर, विजय माने, विलास भोईर, रामअशीष यादव, दमयंती आचरे, सरोज पाटील, शीतल कचरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.