नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील उदयोन्मुख युवा क्रीडापटू, कलावंत आपल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालत असून त्यांचा यथोचित सन्मान करुन पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याचे काम महानगरपालिका करीत आहे असे सांगत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ध्रुव अतुल मोहिते या युवकाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सागरी जलतरण क्रीडा प्रकारात केलेल्या विक्रमांबद्दल गौरव केला. यावेळी आयुक्तांच्या हस्ते ध्रुव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
२० वर्षीय सागरी जलतरणपटू ध्रुव यांनी अरबी समुद्रातील ५ खाड्या पोहून पार केल्या असून त्यांच्या नावे जलदगती जलतरणपटू म्हणून एक वेळा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, ४ वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि २ वेळा बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डमध्ये नोंदविले गेले आहे. अशा विक्रमांची नोंद असणारे ते मान्यताप्राप्त सागरी जलतरणपटू असून त्यांना विविध संस्थांमार्फत सन्मानित करण्यात आले आहे. ध्रुव यांच्या सर्व विक्रमांची नोंद घेत नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील ज्ञान केंद्रात ध्रुव यांचा विशेष सन्मान करीत त्यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह प्रदान केले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त ललिता बाबर, शिक्षण विभागाचे उपआयुक्त दत्तात्रय घनवट, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्क्र, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील व शिरीष आरदवाड, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे व रेवप्पा गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विविध विक्रमांची नोंद
ध्रुव यांनी एलिफंटा आयलॅंड ते गेटवे ऑफ इंडिया हे १२ कि.मी. चे सागरी अंतर ३ तास ७ मिनीटांमध्ये तसेच धरमतर पोर्ट ते रेवस जेट्टी हे १८ कि.मी. चे सागरी अंतर ३ तास ५६ मिनीटांमध्ये पार केले आहे. त्याचप्रमाणे मोरा पोर्ट ते कासा खडक हे १४.१४ कि.मी. चे सागरी अंतर ४ तास ४० मिनीटांमध्ये पार केले असून मोरा पोर्ट ते कारंजा जेट्टी हे २० कि.मी. चे सागरी अंतर ५ तास २० सेकंदामध्ये पार केले आहे. तसेच एलिफंटा आयलँड ते केगाव बीच उरण हे १२.१२ कि.मी. चे सागरी अंतर २ तास ५६ मिनीटांमध्ये पोहून पार केले आहे.