नवी मुंबई : मराठा मोर्चा आंदोलनानंतर निर्माण झालेल्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थ संघटना एकवटल्या आहेत. स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या घणसोली गावात शनिवारी सकाळी एक बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत रबाळे पोलिसांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, तसेच सामाजिक शांततेत बाधा निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय गोडसे यांनी केले.कोपरखैरणेतील घटनेनंतर ग्रामस्थांत कमालीचा असंतोष पसरला आहे, त्याचे पडसाद शहरातील इतर गावांतही उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रबाळे पोलिसांनी ग्रामस्थांशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने शनिवारी घणसोलीतील हनुमान मंदिराच्या प्रांगणात एका बैठकीचे आयोजन केले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने राज्यभरात ५७मोर्चे काढले; परंतु बंद आंदोलनादरम्यान, काही समाजकंटकांच्या कृतीमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. सामाजिक सलोखा बिघडविणाºया प्रवृत्तींची गय केली जाणार नाही. हिंसक आंदोलनाला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांशी समन्वय साधावा, असे आवाहन गोडसे यांनी केले. याप्रसंगी परिवहन समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटील यांचीही भाषणे झाली.या बैठकीला देवस्थान संस्थेचे अध्यक्ष चेतन पाटील, नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील, नगरसेवक घनश्याम मढवी, उत्तम म्हात्रे, गावकीचे सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष शेखर मढवी, गौरव म्हात्रे आदी उपस्थित होते.घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करान्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु या आंदोलनात सर्वसामान्य भरडले जातात. त्यांच्या मालमत्तेचे नुकसान केले जाते. या कृत्याचे कोणीच समर्थन करणार नाही, त्यामुळे कोपरखैरणेतील घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गावकीचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांनी या बैठकीत केली.
शांततेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार, रबाळे पोलिसांनी केले मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 3:08 AM