पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित ग्रामस्थांनी येथील शाळेच्या स्थलांतराला विरोध केला आहे. शनिवारी उलवे, कोंबडभुजे, तरघर, गणेशपुरी या शाळा स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने पंचायत समितीचे अधिकारी शाळेतील दप्तर घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावून दप्तर नेण्यास विरोध दर्शवला.विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या अद्याप सिडकोमार्फत पूर्ण झालेल्या नाहीत. अद्याप संपूर्ण प्रकल्पग्रस्त स्थलांतर झाले नसल्याने सिडकोने या शाळा देखील सुरू राहणे गरजेचे आहे. जबरीने स्थलांतर करण्यासाठी सिडको विविध मार्गाने दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सिडकोने मंदिर उभारण्यासाठी दिलेल्या भूखंडासह आर्थिक साहाय्य दिलेले नाही ते सर्वप्रथम ते देण्यात यावेत, तसेच कोळी बांधवांसाठी जेट्टी या परिसरात उभारावी, स्थलांतरित, नियोजित जागेवर गावनिहाय शाळांची उभारणी करावी, ग्रामस्थांना क्र ीडा मैदाने उपलब्ध करून द्यावीत या मागण्यांसह सिडकोने दिलेली सर्व आश्वासने पाळावीत या मागणीवर ग्रामस्थ ठाम असून या मागण्या पूर्ण केल्याशिवाय शाळा बंद करू दिल्या जाणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. यासंदर्भात या संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांची भेट घेवून चर्चा केली. दरम्यान, शाळेचे दप्तर नेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी उलवे येथे मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता.
शाळा बंद करण्यास ग्रामस्थांचा विरोध; सिडकोकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:31 PM