बारबालांविरोधात शिरवणे ग्रामस्थांनी सुरू केली मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:05 AM2018-07-03T04:05:22+5:302018-07-03T04:05:48+5:30
वाढत्या बारबालांच्या संख्येमुळे चिंतित असलेल्या शिरवणे ग्रामस्थांनी गावाची प्रतिमा सुधारण्यासाठी बारबाला हटाव मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सोमवारी गावात जनजागृती रॅली काढून बारबालांना घरे भाड्याने न देण्याचा संदेश देण्यात आला.
नवी मुंबई : वाढत्या बारबालांच्या संख्येमुळे चिंतित असलेल्या शिरवणे ग्रामस्थांनी गावाची प्रतिमा सुधारण्यासाठी बारबाला हटाव मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सोमवारी गावात जनजागृती रॅली काढून बारबालांना घरे भाड्याने न देण्याचा संदेश देण्यात आला. तसेच सद्यस्थितीला गावात राहणाऱ्या बारबालांना दोन महिन्यात घरे खाली करण्याचाही इशारा देण्यात आला.
सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी उच्चशिक्षितांचे गाव म्हणून परिचित असलेल्या शिरवणे गावाची प्रतिमा सध्या मलीन होत चालली आहे. मागील दोन दशकांपासून गावात बारबालांची संख्या कमालीची वाढली आहे. गावात तसेच गावाभोवती झालेल्या गरजेपोटी बांधकामातील घरे भाड्याने देवून अनेकांनी उदरनिर्वाहाचे साधन निर्माण केले आहे. परंतु जास्त भाडे मिळावे याकरिता दलालांच्या आमिषाला बळी पडून बारबालांना देखील भाड्याने दिली जावू लागली आहेत. कालांतराने नवी मुंबईसह पनवेलमधील बहुतांश बारमध्ये काम करणाºया बारबालांचे वास्तव्याचे ठिकाण शिरवणे गाव बनले आहे. शिरवणे ग्रामविकास मंडळ व ग्राम विकास युवा मंच यांनी एकत्रित येवून मागील काही दिवसात गावकीच्या तीन बैठका घेतल्या. त्यात गावामध्ये बारबालांचे वास्तव्य वाढल्याने होत असलेल्या परिणामाची माहिती ग्रामस्थांना पटवून देण्यात आली. अखेर सोमवारी सकाळी सर्वपक्षीय ग्रामस्थांची बैठक घेवून बारबाला हटाव मोहिमेचा ठराव करण्यात आला. त्यानुसार बैठकीनंतर संपूर्ण शिरवणे गावामध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिला, पुुरुष, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी प्रत्येक घर मालकाची भेट घेवून बारबालांना घर भाड्याने देवू नका असा संदेश दिला. सध्या राहत असलेल्या बारबालांना दोन महिन्यात घर खाली करण्याचाही इशारा देण्यात आला.
बारबालामुक्त शिरवणे गावासाठी झालेल्या बैठकीस नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, सुधागड पाली पंचायत समितीचे सभापती जितेंद्र म्हात्रे, नगरसेविका माधुरी सुतार, रोहिणी भोईर, परिवहन सदस्य श्रीकांत भोईर, दक्षता समितीच्या रमा जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेश पाटील, ठाकूर भोईर, अनिल पाटील, जयेंद्र सुतार, प्रभाकर ठाकूर तसेच युवा मंचचे अध्यक्ष महेश पाटील, अविनाश सुतार, दिनेश ठाकूर, प्रमोद भोईर तसेच अमोल पाटील व सहकारी यांच्या प्रयत्नाने ही मोहीम सुरू झाली आहे.
गावाच्या हितासाठी उभारलेल्या बारबाला हटाव मोहिमेला ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पूर्वी उच्चशिक्षितांचे गाव म्हणून परिचित असलेले शिरवणे गाव सध्या बारबालांचे गाव म्हणून ओळखले जावू लागले आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी ज्येष्ठ व तरुण एकत्रित मोहीम हाताळत आहेत. त्यात यश निश्चित असून पुढील काही दिवसात शिरवणेतून बारबालांचे अस्तित्व मिटलेले असेल.
- प्रभाकर ठाकूर, खजिनदार, ग्रामविकास मंडळ
शिरवणे गावात पूर्णपणे बारबाला मुक्तीसाठी मोहीम उभारण्यात आली आहे. बारबालांच्या वाढत्या संख्येमुळे शिरवणे गावाची ओळख बारबालांचे गाव म्हणून होत चालल्याची खंत आहे. त्यांच्या नादी लागून तरुण मुले गैरमार्गाला जात आहेत. या तरुणाईचे भवितव्य वाचवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजूट होवून मोहीम हाती घेण्यात आली आहे.
- ठाकूर भोईर,
उपाध्यक्ष, ग्रामविकास मंडळ
बारबालांच्या गैर कृत्यांचा परिणाम गावातील महिला व मुलींवर उमटत आहे. बारबालांच्या शोधात येणारे आंबटशौकिन गावातील सामान्य महिला व मुलींकडे देखील त्याच नजरेने पाहत आहेत. यामुळे वाद उद्भवत असून गावाची शांतता भंग होत चालली आहे. त्यामुळे घर मालकांमध्ये जनजागृती करून बारबालामुक्त शिरवणे गाव अभियान हाती घेतले आहे.
- जयेंद्र सुतार,
सचिव, ग्रामविकास मंडळ
बारबालांमुळे संपूर्ण शहरात शिरवणे गावाची प्रतिमा डागाळत चालली आहे. तरुणाई देखील वाममार्गाकडे वळत आहेत. या परिस्थितीत सुधार घडवण्यासाठी सोशल मीडियाच्या आधारे उभारलेली मोहीम आज गावकीचा ठराव झालेली आहे. प्रत्येकालाच महिला, मुलींसह मुलांच्या भविष्याची चिंता सतावू लागल्याने बारबालांविरोधात मोहीम तीव्र झाली आहे.
- अविनाश सुतार,
कार्याध्यक्ष, युवा मंच