गाव-गावठाणांत गुन्हेगारीला आश्रय

By admin | Published: August 29, 2015 10:27 PM2015-08-29T22:27:24+5:302015-08-29T22:27:24+5:30

गेल्या काही दिवसांपासून भाडोत्री घरांमध्ये अवैध वास्तव्य करणाऱ्यांमुळे गावठाण परिसरात अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत. केवळ भाड्याच्या जादा रकमेसाठी, वेश्याव्यवसायासाठी

In villages and villages, shelter for crime | गाव-गावठाणांत गुन्हेगारीला आश्रय

गाव-गावठाणांत गुन्हेगारीला आश्रय

Next

-  सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई
गेल्या काही दिवसांपासून भाडोत्री घरांमध्ये अवैध वास्तव्य करणाऱ्यांमुळे गावठाण परिसरात अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत. केवळ भाड्याच्या जादा रकमेसाठी, वेश्याव्यवसायासाठी अथवा बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन व्यक्तींसाठी घरे भाड्याने दिली जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना थारा मिळत असून पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे.
अवैध धंद्यांवर झालेल्या कारवायांमधून शहरातला गावठाण भाग चर्चेत येऊ लागला आहे. भाडोत्रींची माहिती दडपली जात असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. अशा प्रकारे भाड्याने घेतलेली घरे देहविक्रीसाठी पळवून आणलेल्या मुलींना डांबण्यासाठीदेखील होत आहे. तशा दोन गंभीर कारवाया देखील जुहूगावात झालेल्या आहेत. या कारवाईत बांगलादेश व मध्यप्रदेश येथून पळवून आणलेल्या सुमारे ३० मुलींची सुटका झालेली आहे. या गंभीर प्रकारावरून इतर ठिकाणी देखील राज्याबाहेरून अथवा शहरातूनच पळवलेल्या मुली डांबल्या जात असल्याची शक्यता आहे.
गावठाण भागात पोलिसांच्या झालेल्या अशा कारवायांमधून तिथे गुन्हेगारांना आश्रय मिळत असल्याची गांभीर्याची बाब समोर आली आहे. घर भाड्याने देताना भाडोत्रीची माहिती स्थानिक पोलिसांना देणे आवश्यक आहे. यामुळे सराईत गुन्हेगार भाडोत्री घरात लपून राहण्याचे टळू शकते. मात्र जादा भाड्याच्या लालचेपोटी गावठाणांमध्ये बारबाला, नायजेरियन व्यक्ती किंवा अनोळख्या व्यक्तींना घरे भाड्याने दिली जात आहेत.
सारसोळे व नेरूळ गावांमध्ये सध्या बारबालांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. यामुळे परिसरातील तरुणांवर परिणाम होत असून अनेक जण व्यसनाच्या आहारी जात आहेत. यापूर्वी शिरवणे व कुकशेत गावात बारबालांचे मोठ्या संख्येने वास्तव्य होते. परंतु दक्ष ग्रामस्थांनी गावाची प्रतिमा जपत बारबालांच्या वास्तव्याला विरोध केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र यानंतर दलालांनी दाखवलेल्या जादा भाड्याच्या लालचेने सारसोळे व नेरूळ गावात बारबालांचे वास्तव्य वाढत आहे. बोनकोडे गावात नायजेरियन व्यक्ती मोठ्या संख्येने असून त्यापैकी अनेकांचे अवैध वास्तव्य आहे. रस्त्याने चालणारे त्यांचे घोळके पाहून स्थानिकांनाही धडकी भरेल असे प्रकार त्यांचे सुरु असतात. त्यामुळे काही ग्रामस्थांनी नायजेरियनमुक्त बोनकोडे करण्याचा आवाजही उठवला होता. मात्र भाडेस्वरूपात जादा रक्कम मिळत असल्याने काहींनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. अमली पदार्थ विक्री, लॉटरी स्कॅम अशा अनेक गुन्ह्यातही नायजेरियनचा सहभाग आढळलेला आहे. बंगळुरूमधील गुन्ह्यात फरार असलेल्या नायजेरियनच्या शोधात बोनकोडेत कारवाई झालेली. यावेळी नायजेरियनच्या गटाने पोलिसांवरच हल्ला करून पळ काढला. तेव्हापासून कोपरखैरणे पोलिसांनी राबवलेल्या अभियानामुळे अवैध वास्तव्य असलेल्या नायजेरियन व्यक्तींनी तिथून पळ काढायला सुरवात केली आहे. डॉलरचे आमिष दाखवून फसवण्याचे प्रकार जुहूगाव परिसरात अधिक होत आहेत. मुंबई, ठाणे परिसरातील व्यक्तींना तिथे बोलावून लुटले जात आहे. त्यामुळे गुन्हेगारांना गावठाणातल्या गल्लींचा आधार लपण्यासाठी मिळत असल्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांचा निष्काळजीपणा
गावठाण परिसरात गुन्हेगारांना मिळणारे अभय भविष्यात मोठे संकट ठरू शकते. त्यामुळे वाशी पोलिसांनी जुहूगाव ग्रामस्थांची बैठक घेवून वेश्याव्यवसाय करणाऱ्यांसाठी घरे भाड्याने देवू नये, असे आवाहन केले आहे. त्यानंतरही काही ग्रामस्थांकडून होणाऱ्या निष्काळजीपणाचा गैरफायदा गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्ती घेत आहेत.
देहविक्रीसाठी आणलेल्या मुली, बारबाला यांना ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावठाण भागातील घरांचा वापर होत आहे. तिथली घरे आडोशाचे ठिकाण असल्याने घरमालकांना जादा भाडे देवून दलालांमार्फत ती भाड्याने मिळवली जातात.

घरमालकांनी घर भाड्याने देताना भाडोत्रीची माहिती पोलिसांना कळवणे आवश्यक आहे. तसे झाले तरच अवैध धंद्यांना लगाम लागू शकते. अन्यथा अशा अवैध धंद्यांवर कारवाईदरम्यान घरमालकांचाही त्यात समावेश असल्याचे स्पष्ट होताच त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
- शहाजी उमाप, उपआयुक्त

Web Title: In villages and villages, shelter for crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.