नवी मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भाताना बोगद्याजवळ आज १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचे दुर्दैवी निधन झाले. या बातमीने बीडवर शोककळा पसरली. शिवसंग्राम भवन येथे समर्थकांनी एकच गर्दी केली. यावेळी हुंदके व आश्रूंनी परिसर सुन्न झाला होता. दुसरीकडे नवी मुंबईतील हॉस्पीटलमध्ये नेतेमंडळींनी तात्काळ धाव घेतली. राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आणि आठवणींना उजाळा देण्यात आला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मेटेंसमवेतच्या आठवणी जागवल्या. रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली.
आजच्या दिवसाची सुरुवातच मुळात धक्कादायक अशी झाली. एका सामान्य कुटुंबात, शेतकरी कुटुंबात ज्यांना जन्म झाला. एका लहानशा गावातून समाजासाठी भूमिका घेण्याचा निर्धार करुन एखादी व्यक्ती राज्य पातळीवर आपला प्रभाव कसा पाडते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनायकराव मेटे. गेल्या अनेक वर्षांपासून माझा त्यांच्याशी संबंध होता, शेतकरी आणि शेतीबद्दल आस्था त्यांच्यात होती.
मराठा आरक्षणासंदर्भात जनमत तयार करण्याची त्यांची भूमिका होती. राज्यकर्त्यांसमोर त्यांनी हा प्रश्न प्रभावीपणे मांडला. दिवंगत आर. आर. पाटील यांचे ते जवळचे सहकारी होते. त्यातूनच आमच्यासोबत काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर, महाराष्ट्राच्या विधिमंडळात राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते सर्वप्रथम सहभागी झाले. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी मराठा आरक्षण आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचं मुंबईतील अरबी समुद्रात भव्य स्मारक व्हावा, यासाठी त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं. राजकारणापेक्षा सामाजिक प्रश्नांवर ते अधिक भूमिका घेत राहिले. दुर्दैवाने ते आज आपल्यात राहिले नाहीत, असे म्हणत शरद पवार यांनी विनायक मेटेंच्या आठवणी सांगितल्या.
दरम्यान, रविवारची सकाळ माजी आ. विनायक मेटे यांच्या निधनाच्या बातमीने उगवली अन् बीडकरांना धक्काच बसला. यानंतर पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या दिशेने धाव घेतली तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसंग्राम भवन येथे पोहोचले. यावेळी अनेकांना शोक अनावर होत होता.