मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होण्यास ग्रंथपालही जबाबदार - विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 03:42 AM2018-11-17T03:42:43+5:302018-11-17T03:43:16+5:30
विनोद तावडे : विद्यार्थ्यांसाठी उपक्रमांची गरज
ठाणे : शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करावे, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शाळांच्या आवारात, झाडाखाली डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्ट्यासारखे उपक्रम राबवण्याची गरज आहे. मात्र, तसे न झाल्यामुळे आणि विविध कारणांसह मराठी माध्यमांमधील शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहेत. ही विद्यार्थी संख्या कमी होण्यास शिक्षकांसह शाळांमधील ग्रंथालयांचे ग्रंथपालही जबाबदार आहेत, अशा कानपिचक्या गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ठाणे येथील ग्रंथपाल आनंदोत्सव कार्यक्रमास उपस्थित ग्रंथपालांना दिल्या.
येथील टीपटॉप प्लाझा येथे ग्रंथपाल आनंदोत्सव कार्यक्रमप्रसंगी तावडे बोलत होते. ग्रंथपालांचा विषय सोडवताना त्याकडे मी राजकीयदृष्ट्या कधीच पाहिले नसल्याचे सांगून अजित पवारांना सुमारे २२ वर्षांपासून अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करता आले नसल्याची कोपरखळीदेखील त्यांनी या वेळी मारली. या समस्येतून वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग काढणे क्रमप्राप्त होते. मुळात ग्रंथपालांच्या भूमिकेविषयीचे आकलन नसल्यामुळेच ग्रंथपाल प्रलंबित राहण्याचे खरे कारण असल्याचे प्रतिपादनही त्यांनी या वेळी केले.
समायोजन शिक्षकांची समस्या सोडवेन
नवी मुंबई महापालिकेत समायोजन झालेले शिक्षक हे इतर माध्यमांतील असल्याने त्यांचा प्रश्न लवकरच सोडवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘शिक्षकांच्या समायोजनास नवी मुंबई महापालिकेचा नकार’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १२ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून हा विषय उघड केला होता. आरक्षण टिकणारे मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे. आघाडी सरकारने जे दिले नाही, ते भाजपा सरकारने मराठा समाजाला दिले आहे. केवळ आरक्षण न देता हॉस्टेल आणि शिष्यवृत्तीच्या सुविधादेखील देण्यात आल्या.